…तर इलेक्टोरल बाँड रद्द का करावे लागले? राहुल गांधी यांचा भाजपला सवाल

देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. देशातील लोकशाही आणि संविधान रक्षणासासाठी या निवडणुकीला महत्त्व आले आहे. ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपचा संविधान संपवण्याचा डाव आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. इलेक्टोरल बाँड आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हे बाँड योग्य होते, असे मोदी सांगत आहेत, तर मग सर्वोच्च न्यायालयाला हे बाँड रद्द का करावे लागले. या बाँडद्वारे झालेला घोटाळा आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आला आहे. जनतेत भाजपविरोधात रोष आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला केवळ 150 जागा मिळतील, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

या निवडणुकीत बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे मुद्दे आहेत. मात्र, भाजप किंवा पंतप्रधान या मुद्द्यावर बोलतच नाही. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी ते वेगळेच मुद्दे उपस्थित करत देशात द्वेष पसरवत आहेत. जनमताचा कौल आता इंडिया आघाडीच्या बाजूने आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला वाटत होते की, भाजप 180 जागा जिंकेल. पमात्र, आता भाजपला 150 जागा जिंकणेही कठीण असल्याचे दिसत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजपने खोटी आश्वासने देत सत्ता मिळवली. 10 वर्षात जनतेची धूळफेक केली. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेली नाही. त्या फक्त फोल घोषणाच ठरल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही.तरुणांना रोजगार मिळाला नाही, शहरांचा विकास झाला नाही. या काळात फक्त भाजपच्या मित्रांचा विकास झाला. इलेक्टोरल बॉन्डद्वारे भाजपने केलेला भ्रष्टाचार उघड झाला आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांसाठी भाजप हे आश्रयस्थान बनले आहे, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला.