Lok Sabha Election 2024 : अकाली दलाने युती करण्यास भाजपला का दिला नकार? वाचा सविस्तर…

Lok Sabha Election Punjab Politics News :

देशाच्या राजकारणात शिवसेना-भाजपतील मैत्रीचे दाखले दिले जात होते. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने दिलेल्या शब्दावरून पलटी मारली आणि दोन्ही पक्षांची 25 वर्षांची युती तुटली. आता पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलासोबतचीही युती तुटली आहे. अकाली दलासोबत असं काय घडलं? महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जे घडलं त्याची भीती अकाली दलाला होती का?

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात बोलणी सुरू होती. पण जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत न झाल्याने युती होऊ शकली नाही. आता पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ भाजपवर आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही युती तुटल्याने भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. अकाली दल दीर्घ काळापासून NDA चा घटक पक्ष होता. 2019- 2020 मध्ये केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणल्यानंतर अकाली दल एनडीएपासून वेगळा झाला होता.

अकाली दलाने का केली नाही युती?

भाजपसोबत निवडणुकीसाठी युती न झाल्याने अकाली दलाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत फरक असल्याने युती होऊ शकली नाही. तसेच आगामी 2027 ची पंजाब विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार आहोत, असे अकाली दलाने म्हटले आहे. ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढून आपली वोटबँक बळकट करण्याचा अकाली दलाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

का एकमत झाले नाही?

राजकीय, धार्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर अकाली दलाची असहमती आहेच. पण ‘प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या’ भाजपच्या धोरणाबाबतही अकाली दलाच्या नेतृत्वाला साशंक आहे. भाजप नेतृत्व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमाधून (NDA) 400 जागांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपला पक्ष आणि मतांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास भाजप आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक जागांची मागणी करेल, अशीही भीती अकाली दलाच्या नेत्यांना होती. त्यामुळे भाजपसोबत जाण्यास अकाली दलाने नकार दिल्याचे बोलले जात आहे.

अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल काय म्हणाले?

‘आपल्या पक्षासाठी आकड्यांचे समीकरण कधीच महत्त्वाचे राहिले नाही. गेल्या 103 वर्षांपासून अकाली दलाने पंजाबची प्रगती आणि विकास यासाठी काम केले. आम्ही तत्वांवर चालणारे लोक आहोत. आमच्यासाठी विचारसरणी ही सर्वप्रथम आहे. कोणताच राष्ट्रीय पक्ष पंजापच्या हितासाठी काम करत नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आमचा पक्ष आवाज उठवत राहील, असे अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल म्हणाले.

पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. या 13 जागांसाठी आता भाजप, काँग्रेस, अकाली दल आणि आम आदमी पक्ष अशी चौरंगी लढत होणार आहे. काँग्रेस आणि ‘आप’ यांच्यात एकमेकांच्या सहमतीने सर्व जागांवर मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. तर सर्व जागांवर उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. अकाली दलही सर्व जागांवर निवडणूक लढणार आहे.