मॅजिक बॉक्स – महाशिवरात्री

>> अशोक डुंबरे

भीमाशंकरला मी दूरदर्शनच्या कामानिमित्त दोनतीन वेळा गेलो होतो. अर्ध्या रात्री आम्ही दोनच्या सुमारास मंदिरात पोहोचलो. महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे पूजा झाली. त्याच दिवशी महाशिवरात्रीची भीमाशंकरची ही चित्रफित मराठी बातम्यांमधून दाखवली गेली. महाशिवरात्रीनिमित्त घरबसल्या भाविकांना भीमाशंकरचे दर्शन घडले.

हानपणी देवदर्शनाचा उत्साह वेगळा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी हमखास भीमाशंकरची आठवण येते. मी लहानपणी मंचरला राहत असताना माझे वडील आंबेगाव तालुक्याला असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर होते. तेव्हा त्यांच्याबरोबर भीमाशंकरला शिवरात्रीनिमित्ताने गेलो होतो. शिक्षणाधिकारी असल्यामुळे आमचा मुक्काम आंबेगाव तालुक्यातील शिरोली येथील शाळेत होता. शिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. त्या भीमाशंकरबद्दल आपण जाणून घेऊया.

पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरावर विराजमान असे भीमाशंकर हे ठिकाण आहे. हिंदुस्थानातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे ठिकाण आहे. या मंदिरातले शिवलिंग 32 ते 50 फूट उंचीवर आहे. हे शिवलिंग खूप मोठे असल्यामुळे मोटेश्वर महादेव असे ओळखले जाते. भीमाशंकर या नावाची कथा अशी सांगितली जाते. युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यांनी शिवलिंगाच्या रूपात इथे स्थापित झाले. या ठिकाणी भीमाचे युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला नाव भीमाशंकर पडल्याचे म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी भीमा नदी येथे उगम पावते आणि इथेच गुप्त होते. नंतर दहा-बारा किलोमीटर अंतरावर ती परत वाहते अशी आख्यायिका भीमा नदीबद्दल सांगितले जाते. भीमाशंकर हे घनदाट अरण्यात वसलेले आहे. हे मंदिर खोलगट भागात असून सुमारे 230 पायऱया चढाव्या लागतात. भीमाशंकरचे अभयारण्य 1984 साली सुरू झाले.

भीमाशंकरला मी दूरदर्शनच्या कामानिमित्त दोन-तीन वेळा गेलो होतो. अर्ध्या रात्री आम्ही दोनच्या सुमारास मंदिरात पोहोचलो. महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे त्या वेळचे ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर त्याच दिवशी महाशिवरात्रीची भीमाशंकरची ही चित्रफित मराठी बातम्यांमधून दाखवली गेली. महाशिवरात्रीनिमित्त घरबसल्या भाविकांना भीमाशंकरचे दर्शन घडविता आले त्याचे समाधान आजही मनामध्ये आहे. तसेच एकदा वन विभागातर्फे प्रसिद्धी खात्यामार्फत भीमाशंकर अभयारण्यावर लघुपट करण्यासाठी दोन दिवस आम्ही भीमाशंकरला मुक्काम केला होता. सकाळी उठो तर शेकरू या प्राण्याचे दर्शन झाले आणि आमचे चित्रीकरण यशस्वी झाले. हा प्राणी अतिशय तल्लख असून आवाजावरून माणसाची हालचाल टिपतो आणि पटापट या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. शेकरूचे चित्रीकरण करणे अवघड गोष्ट असते. त्यांची झाडावरची घरटी, राहण्याची स्थळे सर्वच चित्रित करता आले आणि एक 28 मिनिटांची चित्रफित तयार करून ती दूरदर्शनवर दाखविता आली. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल या दिवशी शंकराने प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले. हे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र होय! काही कथेनुसार शिवपार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता. जे महाशिवरात्रीला उपवास करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असेही म्हटले जाते. हिंदुस्थानी

कॅलेंडरनुसार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात महाशिवरात्र येते. हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण असून शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी उपवास व आराधना केली जाते.  पुणे जिह्यात ज्योतिर्लिंग स्थानांपैकी भीमाशंकर असल्याने  महाशिवरात्रीच्या यात्रेला दर्शनाला भाविक आवर्जून भीमाशंकरला जातात.

शिवरात्रीनिमित्ताने अजून एका ऐतिहासिक परामाची कथा आठवली. आदिलशाहीचा एकमात्र खान म्हणजे बहलोल खान ज्याचा 1673 मध्ये कर्नाटकातील उमरानजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजरांनी पराभव केला. शरण आलेल्यास धर्मवाट म्हणून प्रतापराव गुजरांनी बहलोल खानास सोडून दिले. पण सलाह म्हणजे तह केलात, शिपाईगिरी केली अन् सेनापतीसारखा वागला नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापरावांबद्दा मनी सा धरला. दरम्यान, बहलोल खान घटप्रभा नदीजवळील नेसरी कुपे परिसरात खिंडीत तळ ठोकून स्वराज्यावर पुन्हा आाढमण केले तेव्हा प्रतापराव गुजर सामानगड परिसरात होते. त्यांनी महाराजांकडे कुमक मागितली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराज बहलोल खानास सोडून दिल्याने नाराज होते. महाराजांनी फर्मान सोडले की बहलोल खानाचा वध केल्याशिवाय तोंड दाखवू नका. उपलब्ध सैन्यासह लढून विजयी व्हा असा याचा अर्थ होता. उद्विग्न मनाने आपल्या साथीदारासह प्रतापराव गुजर नेसली खिंडीत बदल खानाच्या सैन्या जाऊन भिडले. हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले. प्रतापरावांसह इतर सैन्य धारातीर्थी पडले. नेसरी खिंडीतील हा बलिदानाचा दिवस होता महाशिवरात्रीचा 24 फेब्रुवारी 1674 चा. या वीरांची नावे अशी विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे आणि सरनोबत कुडतोजी ऊर्फ प्रतापराव गुजर. वेडात दौडले सात वीर यांच्यावर एक गाणे पण आहे. असा देदीप्यमान इतिहास शिवरात्रनिमित्त आठवण म्हणून सांगता आला. या ठिकाणी मी जाऊन आलो आहे. तिथे त्यांचे समाधी स्थळ आहे. तसेच गावात सरनोबत प्रतापराव गुजर यांचा अश्वारूढ पुतळाही आहे.

(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)