नवाब मलिकांनंतर आता प्रफुल्ल पटेल रडारवर! भाजप कोंडीत सापडण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामीनावर असून त्यांच्यावर देशद्रोहासारखे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना आपल्यासोबत घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. तसेच हे पत्र व्हायरल झाले. त्यामुळे अजित पवार नाराज झाले. राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांमधील हे नाट्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तसेच हा मुद्दा दिल्लीपर्यंत पोहचला आहे. त्यातच आता नवाब मलिक यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचेही दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे मलिकांबाबत पत्र लिहिले पटेलांबाबत गप्प का, असा सवाल होत असल्याने आता भाजप कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या कारणावरून मलिक यांच्या मुद्द्याबाबत अजित पवार यांना पत्र लिहिल्यानंतर दाऊदचाच सहकारी इक्बाल मिर्चीशी जमीनव्यवहार केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची, असा पेच भाजपपुढे उभा ठाकला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीलेले पत्र थेट प्रसिद्धीमाध्यमांपुढे उघड केल्याने हा वाद भाजप पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला आहे.

वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मिळालेल्या मलिक यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी नागपूर येथे हजेरी लावली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाबरोबर सत्ताधारी बाकांवर बसले. देशद्रोहाचे आरोप केलेल्या मलिकांच्या मांडीला मांडी लावून भाजप नेते कसे बसले, या मुद्द्यावरून विरोधकांनी फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुऴे अस्वस्थ झालेल्या फडणवीस यांनी आधी देश, सत्ता नंतर, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करून पवार यांना पत्रच लिहीले आणि महायुतीपासून मलिकांना दूर ठेवण्याचा सल्ला दिला. हे पत्र फडणवीस यांनीच प्रसिद्धी माध्यमांकडे जाहीर केल्याने पवार नाराज झाले आहेत आणि ही बाब भाजप पक्षश्रेष्ठींच्या कानी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आता कोंडीत सापडला आहे.

आता मलिकांबरोबरच प्रफुल्ल पटेल यांच्या इक्बाल मिर्चीबरोबरच्या संबंधांबाबतचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्याने फडणवीस व भाजपची कोंडी झाली आहे. पटेल यांचे दाऊदचा सहकारी मिर्चीशी संबंध असून वरळीतील सीजे हाऊस या मालमत्तेच्या विकासावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 21 जुलै 2022 रोजी कारवाई करून अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमतेच्या व्यवहाराच्या बदल्यात पटेल यांनी मिर्चीच्या निकटवर्तीय व नातेवाईकांना 22 कोटी रुपये, सात सदनिका दिल्याचा आरोप आहे. ईडीने पटेल यांच्या सदनिका, एक चित्रपटगृह, हॉटेल, पाचगणी येथे एक हॉटेल, दोन बंगले आणि साडेतीन एकर जमीन एवढ्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

पटेल यांचे मिर्चीशी असलेल्या संबंधांवरून फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईनंतर आणि आधीही अनेकदा आरोप केले आहेत. मलिक यांच्यावर देशद्रोही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले, तेव्हाही पटेल व मिर्ची आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटेल यांच्याविरोधात मोर्चा काढून निदर्शनेही केली होती. मात्र अजित पवारांबरोबर खासदार पटेल भाजपबरोबर आल्यावर फडणवीस यांनी आपली भूमिका बदलली. फडणवीस हे गोंदिया येथे 9 फेब्रुवारी 23 रोजी एका कार्यक्रमात पटेल यांच्याबरोबर सहभागी झाले होते. तसेच त्यांनी पटेल यांचा उल्लेख ‘ जवळचे मित्र आणि भाऊ ‘ असा केला. पटेल यांच्यावर देशद्रोही मिर्चीशी संबंध असल्याने आरोपांची तोफ डागणाऱ्या फडणवीस यांना पटेल हे सत्तेत सहभागी झाल्याने मित्र आणि भाऊ वाटायला लागले आहेत. यावरूनही त्यांच्यावर टीका होत आहे.

नवाब मिलक यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेप्रमाणे भाजपला पटेल कसे चालतात, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. पटेल यांचे भाजप पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध असून त्यांना दूर करणे, फडणवीस यांना शक्य नाही. त्यामुळे पटेल यांच्याबाबत कोणती जाहीर भूमिका घ्यायची, असा पेच फडणवीस आणि भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकला आहे.