पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहेत का? संजय राऊत यांचा रोखठोक सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहेत का, असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच चंदा दो, धंदा लो या नीतीने ते भ्रष्टाचार कसा नष्ट करणार आहेत, असा सवालही त्यांनी केला. जनतेने निवडणूक रोख्यांचा भ्रष्टाचार बघितला आहे. जनता हे सर्व बघत आहे. पंतप्रधान आता स्क्रिप्ट वाचून दाखवत भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहेत, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा भाजपने केली. मात्र, निवडणूक रोखे हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहे. 10 हजार कोटी रुपयांचे इलेक्ट्रोरल बाँड भाजपच्या खात्यात जामा झाले. ‘चंदा दो, धंदा लो’ असे धोरण राबवत काळ्या यादीत असलेल्या अनेक कंपन्यांना, कंत्राटदारांना सरकारने कामे दिली. ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या सुरू असलेल्या कारवाया थांबावण्यासाठी भाजप चंदा घेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार करतो. त्याचे पंतप्रधान समर्थन करत आहेत. ही त्यांची भ्रष्टाचार रोखण्याची कोणती नीती आहे. हे म्हणजे धमकावत केलेली वसूली आहे.

तुरुंगात असलेल्यांना बाहेर काढण्यासाठीही भाजपने पैसे घेतले आहेत. याचे पंतप्रधान समर्थन करत आहे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यांची सर्वभाषणे म्हणजे स्क्रिप्ट असते. त्यात नवीन काहीच नाही. त्यांची ज्या चुका आणि अपराध केले, ते लपवण्यासाठी आणि त्याचे समर्थन करण्यासाठी ही स्क्रिप्ट असते. इलेक्ट्रोरल बाँड मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार असल्याची देशाची भावना आहे. जनतेने हा घोटाळा पाहिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक रोखे अवैध ठरवले आहेत. त्यानंतर निवडणूकीपूर्वी या भ्रष्टाचाराचे समर्थन करण्यासाठी पंतप्रधान मुलाखत देत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार नष्ट केलेल्या घोषणा भंपक आणि खोट्या आहेत. असा भ्रष्टाचार दुसऱ्या देशात घडला असता तर तेथील पंतप्रधानांना बडतर्फ करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असता. त्यानंतर खटला चालवून त्यांना तुरुंगात टाकले असते. चंदा दो, धंदा ले किंवा धंदा लो चंदा लो, वसुली आणि दहशतीच्या मार्गाने भाजपने पैसे जमा केले. इलेक्ट्रोरल बाँड कल्पना वाईट नाही. मात्र, त्याचे भ्रष्टाचारात रुपांतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपने केले, असेही संजय राऊत म्हणाले.

भ्रष्टाचारी नेते, उद्योगपती यांना भाजपने स्वतःच्या पक्षात घेतले, त्यावर मोदी का बोलत नाही, असा सवालही त्यांनी केला. अशा भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपने स्वतःकडे घेत त्यांना शुद्ध करून घेतले. कारवाय राजकीय की गैरराजकीय हा प्रश्न नसून प्रश्न त्यांच्या वॉशिंग मशीनचा आहे. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनाच आता पक्षात घेतले आहे, त्यावर मोदी का बोलत नाही. याबाबत त्यांच्याकडे स्क्रिप्ट नसेल, तर ती आम्ही देतो, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे, त्यांना अडचणीतल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, हे आपण पाहिले आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांची 56 इंची छाती आहे, त्याचा अभिमान आहे. मात्र त्यांचे मोजमाप खरे असावे. अशी 56 इंची छाती असलेल्या पंतप्रधानांनी 10 वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. हे देशाचे दुर्दैव आहे. आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलतो, त्यांचे घोटाळे उघड करतो. त्यामुळे आमची मानसीकता ठीक नाही, अशी टीका भाजपवाले करतात. मात्र, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तरे का देत नाहीत, असा रोखठोक सवालही संजय राऊत यांनी केला.