जीव गेला तरी बेहत्तर, आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही; मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार

गेल्या 70 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणापासून सरकारने वंचित ठेवले आहे. आता हा लढा निर्णायक पातळीवर आला असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. घरीही जाणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणाचा संघर्ष सुरुच राहील, असा निर्धार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत 35 लाख नोंदी सापडल्या आहेत, आता तरी सरकारने जागे होवून मराठा आरक्षणाचा कायदा करावा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

गुरुवारी बारडमध्ये आणि शुक्रवारी मुसलमानवाडी पाटी, मारतळा, नायगाव येथे जरांगे पाटील त्यांच्या सभा झाल्या. या सभेत त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा समाजाला साद घालत आरक्षण मिळेपर्यंत आता प्रत्येक गावात जावून प्रबोधन करण्याचे आवाहन केले. शेती करणारा हा समाज जनतेच्या पोटासाठी अन्नधान्य पिकवतो, राबराब राबतो. मात्र, या समाजाला आरक्षणापासून राजकीय मंडळींनी दूर ठेवले. आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये,यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. मराठा समाज ओबीसी असल्याच्या नोंदी 1805 ते 1967 ते आता 2023 पर्यंत याचे पुरावे मिळत आहेत. आतापर्यंत 35 लाख नोंदी सापडल्या आहेत. 70 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या आहेत. आपल्या समाजाला आरक्षण कुणी मिळू दिले नाही, हे आता समजलेच पाहिजे. त्यांनी जाणूनबुजून आमच्या लेकरांचे वाटोळे केले, काबाडकष्ट करुन पाऊस, वारा, थंडी, कडक उन अंगावर घेत समाज राबराब राबला. सर्वांसाठी अन्नधान्य निर्माण करत गेले, मात्र आरक्षणाचा तिढा सरकारी यंत्रणेने सोडवला नाही. आजपर्यंत इतर समाजाने मराठा समाजाचे आरक्षण दडवून ठेवले. ओबीसीच्या नावावर आमच्या आरक्षणाचा फायदा मिळविला, आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजाला नोकर्‍या मिळाल्या नाहीत. हताश झालेला आमचा युवक आत्महत्या करत आहे. त्यामुळेच आता हा संघर्ष आपल्याला अंतिम टप्प्यापर्यंत न्यायचा आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या लेकरांसाठी आहे. हा लढा आपल्याला आता जिंकायचा आहे, आरक्षण आता मिळवायचेच हा संकल्प आता करायचा आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

आता राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आपल्या बाजूने कोणकोण बोलतो याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. मग ते सत्ताधारी असो, वा विरोधक, मराठ्याचे लेकरु आरक्षण मागत आहे. ओबीसीमधून आरक्षण देणारा कायदा या अधिवेशनात करा. आपल्या लेकराच्या पाठिशी तुम्ही उभे राहा, मराठा समाज आपले उपकार विसरणार नाही. सभागृहात बोलला नाही तर मराठे तुम्हाला माफ करणार नाहीत, आता हा लढा निर्णायक अवस्थेत आला आहे. तो आम्ही जिंकणारच, आपण एकजुटीने राहिलो तरच हे शक्य असून, आपल्यात फूट पाडणार्‍यापासून डोळ्यात तेल घालून सावध रहा, सरकारला थोडीफार लाज वाटत असेल तर तात्काळ आरक्षण द्या,अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

मराठी आरक्षणाविरुध्द गरळ ओकणार्‍या छगन भुजबळांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. आमच्या जीवावर पोळ्या भाजून सत्तापदे भोगली, मोठे झालात, आता नोंदी कशा सापडत आहेत. 35-35 वर्षांपासूनच्या जुन्या नोंदीचा लेखाजोखाच आता समोर येत आहे. आमच्या आरक्षणावर आता आपण जगलात आणि आता आमच्यावरच टिका करुन आरक्षणाला विरोध करता, वेळ येईल तेव्हा तुम्हाला बघून घेऊ. आमच्या नादाला लागू नका, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.

तुम्हाल तुमची जात प्रिय, आम्हाला आमची जात प्रिय, त्यामुळे आता कितीही ओरडून ओरडून विरोध केला तरी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर गावच्या गाव पिंजून काढा, प्रत्येक गावात जावून आरक्षणाबाबत प्रबोधन करा, आपली एकजूट कायम राहिली तर सरकारला शरण यावेच लागेल आणि आरक्षण द्यावेच लागेल. हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा विजय असणार आहे. जातीजातीत भांडणे लावून दंगली पेटविण्याचा प्रकार काही मंडळीकडून होत आहे. आम्हाला भडकवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, आम्ही शांत आहेत, तोपर्यंत शांत राहू द्या, हा वणवा भडकवू देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला. गावागावातील ओबीसी व मराठा एकोप्याने राहतात, अडीअडचणीला एकमेकाला मदत करतात, अशावेळी आपल्यात मतभेद निर्माण करुन जातीय विषमता निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु आहे. मात्र आमचा संयम ढळू देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांच्या लेकरांसाठी माझा लढा आहे, आणि त्याला सबंध महाराष्ट्राचे पाठबळ मिळत आहे. आपली ही एकजूट आपल्याला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

…आणि जरांगे झाले भावूक
जिजाऊ नगरातील व अन्य सभांमध्ये आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात मनोज जरांगे अत्यंत भावूक झाले. उपोषणापासून ते आजपर्यंत चार महिने झाले घरी गेलो नाही. जीव गेला तरी बेहत्तर, मात्र तुम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता घरी जाणार नाही. मला माझ्या माय-बापासारखे प्रेम या समाजाने दिले आहे. हा समाजाच माझा माय-बाप आहे. भलेही माझे बलिदान झाले तरी चालेल. मात्र, आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. मी घरी बायकोला सांगितले आहे, कुंकू पुसून तयार राहा, अनेकांचे बलिदान समाजासाठी झाले आहे, समाजाने दिलेली माया मी कधीही विसरणार नाही. माझे हे जीवन सार्थकी लागावे यासाठी तुमची एकजूट महत्वाची आहे. मात्र आता आत्महत्या करु नका, उद्रेक करु नका, संयम ठेवा, या समाजाशी मी गद्दारी करणार नाही. आज ही संधी हुकली तर पुढच्या दहा पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळे जीव गेला तरी हरकत नाही, आता मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.