आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक; गेवराईत मुंडण करत सरकारचा निषेध व्यक्त

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मादळमोही येथे रविवारी ( दि.29 रोजी) मुंडण आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या निषेधार्थ अनेकांनी मुंडण करुन शासनास जागे करण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण प्रकरणी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचे प्रतिकात्मक दहावे घालत जाहीर निषेध केला.

या साखळी उपोषणात मादळमोही, बुधनेरवाडी, कुंभारवाडी, सिंदखेड, मानमोडी, मुळूकवाडी, जवारवाडी, सिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी, टाकळगव्हाण, काळेवाडी, भडंगवाडी, इटकूर, शिंपेगाव, लोळदगाव, पोखरी, शहाजानपूर, अनकुटा, वंजारवाडी, कोळगाव, माणकापूर, खडकी, गाडेवाडी, धारवंटा, उक्कडपिंप्री, सावरगाव, साठेवाडी चिखली, वडगाव, सुशी, कुंभारवाडी येथील मराठा बांधवाचा सहभाग आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या प्रमुख मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ मादळमोही येथे परिसरात गावातील मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच मराठा समाजातील तरूणांच्या दररोज आत्महत्या होत आहेत. या सरकारला जाग येत नाही. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ मादळमोही येथे सकल मराठा बांधवाच्या वतीने राज्यातील तिघाडी सरकारचा दहावे घालत दशक्रिया विधी करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ अनेक जणांनी मुंडण करत शासनास जागे करण्याचा प्रयत्न केला.