अभिजात भाषा कधी?

>> सुनील कुवरे

मराठी भाषा सर्वांगसुंदर भाषा असून हिंदुस्थानातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा आहे, तर हिंदुस्थानात तिसरी भाषा आहे. महाराष्ट्राबाहेर पंधरा विद्यापीठांत मराठी भाषा शिकवली जाते. जगातील 52 देशांत मराठी भाषिक प्रामुख्याने राहत आहेत. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल आहे. 1965 मध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आतापर्यंत तामीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया अशा सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र मराठीला तो सन्मान अद्यापि मिळालेला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सतत मागणी होत आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडे पाठपुरावाच सुरू आहे. नुकतेच मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे पार पडले. तिथेसुद्धा दरवर्षीप्रमाणे मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर केला गेला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक साहित्य संस्थांनी लोकचळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला. तरीही राज्य सरकारकडून आवश्यक प्रयत्न होताना दिसत नाही. जे प्रयत्न केले त्याला केंद्रीय स्तरावर योग्य मान दिला जात नाही. केंद्र सरकारकडून मराठीच्या अभिजात दर्जावरून टोलवाटोलवी सुरू आहे.

मराठी भाषा अभिजात आहे हे आता तज्ञांनी मान्य केले आहे. तेव्हा मराठी भाषेचा अभिमान बाळगताना त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना त्याच वेळी ती ज्ञानभाषा व्हावी. तसेच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी भाषेविषयी आदर निर्माण होण्याची जास्त गरज आहे. इतर राज्यांतील लोक आपापल्या राज्यातील प्रादेशिक भाषेचा जसा आदर करतात, तेवढाच आदर आपण आपल्या मराठी भाषेचा करायला हवा.