मिंधे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; मराठा आरक्षणासाठी घेतला निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अनेक गावांमधून पाठिंबा मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी साखळी उपोषणही करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये नेते, मंत्री, आमदार यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिथे जिथे नेते जातील तिथे मराठा आंदोलक त्यांचा निषेध करत आहेत. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मिंधे गटाच्या एका खासदारांने आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवले आहे.

शिंदे गटाच्या एका खासदाराने मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी केंद्र सरकारच्या दरबारात मांडावी, यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे राज्यात याबाबतची चर्चा होत आहे.

आपण मराठा समाज आणि शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला आहे. याबाबत समाजाच्या भआवना तीव्र आहेत. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिबा असून या मागणीसाठी आपण राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.