अडीचशे कोटींचा एमडी साठा जप्त; दहा जणांना बेडय़ा

मुंबई गुन्हे शाखेने ड्रग्जविरोधात कुर्ला ते सांगली व्हाया सुरत असा तपास करत मोठी कारवाई केली. कुर्ल्यात एका ड्रग्ज तस्कर महिलेला पकडल्यानंतर युनिट-7 च्या पथकाने कौशल्याने तपास करत एमडीचा पुरवठा होत असलेल्या सांगलीतल्या इरळी गावातील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी दहा जणांच्या मुसक्या आवळून सुमारे 252 कोटी 55 लाख 38 हजार रुपये किमतीचा एमडी व अन्य मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी फत्ते केली.

16 फेबुवारी रोजी वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुर्ला येथे परवीन बानो शेख (33) या महिलेला 641 ग्रॅम एमडीसह रंगेहाथ पकडले. तिच्याकडून एमडी विकून जमा असलेले 12 लाख 20 हजार व 25 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. निरीक्षक आत्माजी सावंत यांनी तिची चौकशी केली असता मीरा रोड येथील व्यक्तीकडून हे एमडी घेतल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मीरा रोड येथील ड्रग्ज पेडलर साजीद शेख ऊर्फ डेबस (25) याला उचलले. त्याच्याकडून 6 कोटी किमतीचा 3 किलो एमडी व 3 लाख 68 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्या चौकशीत तो सुरत येथील दोघांना एमडी विकत असल्याचे समोर आले. मग त्यानुसार निरीक्षक शिंदे, उबाळे, स.पो.नि. अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्नील काळे, रामदास कदम, शेलार व पथकाने सुरतेत जाऊन इजाजअली अन्सारी (24) आणि आदिल बोहरा (22) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. या चौघांकडे कौशल्याने केलेल्या चौकशीत ते सांगलीतून हा एमडी घेत असल्याचे समोर आले. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांगलीतले इरळे गाव गाठून द्राक्षाच्या शेताच्या आड लपून गुपचूप सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणी 1लाख 22 हजार 500 किलो वजनाचा एमडी, एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून 6 जणांना अटक केली.

12 एकर जमीन, साहित्य खरेदी करून…

सांगलीतून पोलिसांनी प्रवीण शिंदे (34), वासुदेव जाधव (34), प्रसाद मोहिते (24), विकास मलमे (25), अविनाश माळी (28) आणि लक्ष्मण शिंदे (35) अशा 6 जणांच्या मुसक्या आवळल्या. यातील प्रवीण हा मुख्य कलाकार, मूळचा सांगलीचा असलेला प्रवीण परिवारासह मीरा रोड येथे स्थायिक झाला होता. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या प्रवीणने 4 वर्षांपूर्वी यूपीमध्ये जाऊन एमडी बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. तेथून महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने अन्य सहकाऱयांच्या मदतीने इरळे गावात पाण्याची व्यवस्था, आजूबाजूला शेती असेल अशी थोडी उंचावर 12 एकर जमीन खरेदी केली. त्यापैकी अर्ध्या एकरात त्याने कारखाना उभा केला. सर्व साहित्य नव्याने विकत आणून त्याने अन्य सहकाऱयांच्या मदतीने एमडी बनविण्यास सुरुवात केली होती.

n प्रवीणला प्रत्येक किलोमागे एक लाख रुपये मिळत होते, तर उर्वरित 5 जण मूळचे शेतकरी आहेत, पण एमडी बनविण्यासाठी एकत्र यायचे. पाच-सहा दिवस मिळून एमडी बनवायचे. मग पुन्हा आपल्या शेतीच्या कामाला लागायचे. झटपट पैसा कमावण्यासाठी या सर्वांनी नको तो मार्ग निवडला, पण तोच मार्ग त्यांना गजाआड घेऊन गेला. प्रवीणला अर्थसहाय्य व अन्य मदत करणाऱयांचा शोध सुरू असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.