अग्निशमन दल भक्कम, 459 जवान सेवेत दाखल

मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दलात भरती करण्यात आलेल्या 910 पैकी 459 जवान प्रशिक्षण पूर्ण करून अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल झाले आहेत, तर आणखी 459 जवान लवकरच आपली सेवा बजावण्यासाठी अग्निशमन दलात दाखल होणार आहे. यामुळे पालिकेचे अग्निशमन दल मजबूत झाले आहे.

मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल आठ वर्षांनंतर मुंबई अग्निशमन दलात तब्बल 910 जवानांची भरती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेत 910 जवानांमध्ये 250 हून अधिक महिला जवानांचा समावेश आहे. यातील पहिल्या टप्प्यात 459 जवान कर्तव्यावर हजर झाले असून उर्वरित जवान लवकरच सेवेत रुजू होणार असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली. अग्निशमन दलात सद्यस्थितीत अधिकारी व जवान असे अडीच हजार जण सेवा बजावत आहेत. परंतु झपाटय़ाने औद्योगिक विकास होणाऱया मुंबईला जवानांची संख्या कमी पडत असल्यामुळे 910 जवानांची भरती करण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्या 459 पुरुष आणि महिला उमेदवारांना 23 जानेवारी 2024 पासून अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना अग्निशमन दलाच्या 35 फायर स्टेशन आणि कंट्रोल रूममध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे आंबुलगेकर यांनी सांगितले.

अशी पार पडली प्रक्रिया

महिला उमेदवारांसाठी 273 जागा होत्या. पहिल्या टप्प्यात 555 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यांना 5 जुलै 2023 पासून प्रशिक्षणासाठी अग्निशमन दलाच्या वडाळा, मानखुर्द, बोरिवली आणि विक्रोळी येथे प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. उमेदवारांचे प्रशिक्षण 5 जानेवारी 2024 रोजी पर्यंत होते.

n प्रशिक्षणात 555 पैकी 459 उमेदवार पास झाले. जे प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाले त्यांना पुन्हा दुसऱया टप्प्याच्या प्रशिक्षणात वाढीव प्रशिक्षण देण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर 2023 पासून दुसऱया टप्प्यातील 355 उमेदवारांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या मे 2024 मध्ये प्रशिक्षण संपणार आहे.