सूरतमधील हिरे व्यापाऱ्याने बनवला श्री रामाचा रत्नहार; 5000 अमेरिकन डायमंडचा केला वापर

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची उत्कंठा आता देशवासियांना आहे. राम मंदिरातील रामललाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या पवित्र मूहूर्त लक्षात ठेवत सूरतमधील हिरे व्यापारी कौशिक काकडिया यांनी राम मंदिराच्या थीमवर श्रीरामासाठी रत्नहार तयार केला आहे. या रत्नहारात 5000 पेक्षा जास्त अमेरिकन डायमंड वापरण्यात आले असून 2 किलो चांदी वापरण्यात आली आहे. कौशिक हा रत्नाहार श्री रामासाठी राम मंदिराला अर्पण करणार आहेत.

नव्या राममंदिराच्या थीमवर आम्ही हा रत्नहार बनवला आहे, असे रसेश ज्वेलचे निर्देशक काकडिया यांनी सांगितले. हा रत्नहार कोणत्याही व्यापारी हेतूने बनवण्यात आलेला नाही. हा रत्नहार आम्ही श्रीरामासाठी राम मंदिराला अर्पण करणार आहोत. राम मंदिराची प्रतिकृती आणि रामायणातील अनेक घटना या रत्नहारात डायमंडद्वारे रेखाटण्यात आल्या आहेत.

अयोध्येत 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी राममंदिर खुले होणार आहे. तर 24 जानेवारीपासून 48 दिवस विशेष मंडल पूजा करण्यात येणार आहे. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्री रामाच्या चरण पादुकाही ठेवण्यात येणार आहेत. या चरण पादुका एक किलो सोने आणि सात किलो चांदीने बनवण्यात आल्या आहेत. सध्या या पादुका देशभरात फिरवण्यात येत आहेत. या पादुका हैदराबाद येथील श्रीचल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी बनवल्या आहेत.