लोकसभेच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; एका मतदरासंघातील निवडणूक रद्द

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. मात्र, मध्य प्रदेशात एका मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील बैतूल- हरदा मतदारसंघातील बहुजन समाजवादी पक्षाचे उमेदवार अशोक भलावी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे बैतूल हरदा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

भलावी यांना मगंळवारी दुपारी अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भलावी यांनी 2019 मध्येही बसपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातील 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. मात्र, आता भलावी यांच्या निधनामुळे येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून आता पुढील तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. या मतदारसंघात एकूण आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, आता भलावी यांच्या निधनाने या मतदारसंघात सात उमेदवार आहेत.