राष्ट्रीय शेअर बाजाराने पुन्हा गाठला उच्चांक; निफ्टी 21 हजाराच्या पार, RBI च्या घोषणेने बाजाराची उसळी

जागतिक अस्थिरतेच्या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराची घोडदौड सुरूच आहे. नुकताच राष्ट्रीय शेअर बाजार जगातील पाचवा सर्वाधिक मोठा बाजार ठरला आहे. त्यातच शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा केली आहे. बँकेने रेपो रेट 6.5 टक्के स्थिर ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाला बाजाराने सकारात्मक प्रतिसाद देत उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टीने नवा उच्चांक गाठत 21 हजाराचा टप्पा पार केला. तर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 300 अंकांची उसळी घेत 70 हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे.

शुक्रवारी कामकाजाची सुरुवात होताच बाजार तेजीत होता. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट स्थिर ठेवण्याबाबतच्या घोषणेने बाजाराने जबरदस्त उसळी घेतली. बाजाराच्या या तेजीने निफ्टीने इतिहास रचला आहे. निफ्टीने पहिल्यादांच 21 हजाराचा टप्पा गाठला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत निफ्टीने 15.36 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तर सहा महिन्यात 12.65 टक्क्यांची म्हणजेच 2,357 अकांची वाढ नोंदवली आहे.

निफ्टीने ऐतिहासिक टप्पा गाठली असतानाच मुंबई शेअर बाजारही नवा विक्रम गाठण्याच्या जवळ आहे. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत 300 अंकांची वाढ होत तो 69,821 वर पोहचला आहे. बाजारात अशीच तेजी कायम राहिल्यास मुंबई शेअर बाजार 70 हजाराचा टप्पा गाठण्याजवळ आहे. मुंबई शेअर बाजाराने जानेवारीपासून आतापर्यंत 14.14 टक्क्यांची तर सहा महिन्यात 11.09 टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजाराच्या तेजीमुळे मिडीया, मेटल, फायनान्शिल सेवा, बँक निफ्टी, आयटी, पीएसयू बँक, खासगी बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.