हिंमत असेल तर 2024 निवडणुकांपूर्वी POK मिळवून दाखवा, देश तुम्हालाच मत देईल; अधीर रंजन चौधरींचे आव्हान

adhir-ranjan-chaudhari

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 बाबतच्या बुधवारी केलेल्या निवेदनात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले होते. आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी शहा यांच्या विधानाला चोख प्रत्युत्तर देत त्यांना आव्हानही दिले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे दोघे शूर आहेत, असा टोला हाणत या दोघांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 2024 च्या निवडणुकांपूर्वी POK घेऊन दाखवावे, देशातील सर्व जनता त्यांनाच मतदान करेल, असे आव्हान दिले आहे.

अमित शहा यांनी POK ही पंडित नेहरू यांची चूक होती. नेहरू यांच्या दोन चुकांमुळे POK ची निर्मिती झाली असा दावा करत नेहरूंवर टीका केली होती. त्याला अधीर रंजन चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या मुद्द्यावर संसदेत दिवसभर चर्चा करण्यात यावी, हा छोटा मुद्दा नसून गंभीर विषय आहे. पंडित नेहरू यांची चूक होती, असे मान्य केले तरी देशाचे शूर गृहमंत्री अमित शहा दशकभरापासून काय करत आहेतद, असा सवाल त्यांनी केला.

2019 मध्ये कलम 370 हटवण्यात आले, तेव्हा शहा म्हणाले होते की, पीओके, सियाचीन हा कश्मीरचा अविभाज्य भाग आहे आणि तो परत मिळवण्याचा दावा ते करत आहेत. मात्र, आता मोदी सरकारची 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना POK घेण्यापासून कोणी अडवले आहे, देशात दोन शूरवीर आहेत…पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, या दोघांना कोणी अडवले आहे, हिंमत असेल तर त्यांनी POK वर ताबा मिळवावा, असे आव्हानच चौधरी यांनी दिले.

POK तर लांबच राहिले, त्यांनी तेथील एक सफरचंद आणून दाखवावे आणि म्हणावे आम्ही करून दाखवले. POK मधून चीन-पाकिस्तान कॉरिडॉर बनत आहे आणि हे शूरवीर फक्त बघत आहेत. ते जी-7, शांघाय शिखर समितीत जातात. आंतरराष्टीय स्तरावर याचा पाठपुरावा का करण्यात येत नाही. लडाख आणि गलवानमध्ये चीनने घुसखोरी केली आहे आणि हे शूरवीर बघत आहेत. या दोन शूरवीर हम्टी डम्टींनी 2024 च्या निवडणुकांपूर्वी POK घेऊन दाखावाव, देशात त्यांनाच मतदान होईल, असे आव्हान चौधरी यांनी दिले आहे.