नितीन गडकरी यांच्या जुन्या वक्तव्याचा दिला संदर्भ; प्रशांत भूषण यांचा ईव्हीएमवर सवाल

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत त्याच्या विश्वासार्हतेबाबत शंका निर्माण झाल्याचे सांगत त्याला विरोध केला आहे. ईव्हीएम सदोष असून आगामी निवडणुका VVPAT किंवा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी होत आहे. देशभरातूनही या मागणीचा जोर वाढत आहे. ईव्हीएममुळेच भाजपाचा विजय होऊ शकला, असाही दावा करण्यात येत आहे. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रशांत भूषण यांनी नितीन गडकरी यांचे 2010 मधील एका वक्तव्य सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या वक्तव्यात गडकरी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. नितीन गडकरी म्हणाले होते की, भाजप ईव्हीएमविरोधात नाही. या प्रणालीचे आधुनिकीकरण केले पाहिजे. आम्ही आधुनिकीकरण किंवा ईव्हीएमच्या विरोधात नाही. मात्र, आम्हाला फक्त कागदाचा आधार हवा आहे. या वक्तव्यावरून सुरुवातीच्या काळात ईव्हीएमला भाजपकडून प्रकर्षाने विरोध करण्यात आला होता. मात्र, आता भाजप ईव्हीएमसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशांत भूषण यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

2010 मधील नितीन गडकरींचे हे वक्तव्य शेअर करत प्रशांत भूषण यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणतात की, भाजप, मोदी सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोग VVPAT ला का विरोध करत आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार VVPAT मशिन्स बसवण्यात आल्या होत्या. अनेक मतदार आणि पक्षांनी ईव्हीएमवर अविश्वास दाखवला असताना VVPAT (मतं) का मोजले जात नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

पाच पैकी तीन राज्यात भाजपने यश मिळवले आहे. पाच राज्यापैकी भाजपला तीन राज्यात विजय मिळाला, ही ईव्हीएमची कमाल असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. आता राजकीय पक्षांसह प्रशांत भूषण यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.