नीरा उजवा कालव्याच्या पाणी वाटपाचे ‘तीनतेरा’

नीरा उजव्या कालव्यातून सध्या पंढरपूर भागात उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन (पाणी) सुरू आहे. सिंचन सुरळीतपणे पार पाडावे, अशी मागणी शेतकऱयांची आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडूनच ‘टेल टू हेड या नियमाला तिलांजली दिली जात आहे. पाणी टेलच्या शेतकऱयांकडे पूर्ण क्षमतेने जाणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. कालव्यालगतचे शेतकरी अधिकाऱयांना हाताशी धरून रात्री-अपरात्री दारे उघडून पाणी नेत आहेत. त्यामुळे सिंचनात विस्कळीतपणा येत आहे. उन्हाळय़ाची परिस्थिती असल्याने पाण्यासाठी शेतकऱयांमध्ये वादावादी सुरू आहेत.

उन्हाळी हंगामातील पिकांना नीरा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, उन्हाळ्याची परिस्थिती पाहता, अधिकाऱयांना प्रत्यक्ष जागेवर उभे राहून पाणी शेतकऱयांना देणे गरजेचे आहे. कारण पाण्यासाठी शेतकरी भांडण करू लागले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मात्र, अद्यापि पंढरपूर ग्रामीण, तसेच तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक यांचे पत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पाणीवाटपात विस्कळीतपणा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नीरा उजवा कालवा फलटण कार्यालयाअंतर्गत मोठा प्रकल्प वीर धरण, नीरा उजवा कालवा कि.मी. 0 ते 169 व शाखा क्र. 1 ते 5, तसेच दोन मध्यम प्रकल्प, 22 ल.पा. प्रकल्प व 8 को.प. बंधारे एवढा विस्तृत स्वरूपाचा सिंचन व्यवस्थापनेचा कार्यभार आहे. या कार्यालयाअंतर्गत अत्यल्प कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनाचे कामकाज पार पडताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या व लोकप्रतिनिधींच्या रोषाला पाटबंधारे विभागाला सामोरे जावे लागत आहे. अपुऱया कर्मचाऱयांमुळे ‘टेल’च्या लाभधारकांना वेळेत पाणीपुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे.

गेल्या आठवडय़ात पंढरपूर तालुक्यातील रांझणी भागात पाणी सुरू असताना उजनी कालवा क्रॉसिंग भागात सिंचन विस्कळीत झाले होते. ते सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी गेला. असे प्रकार घडल्याने सिंचन व्यवस्थापन सुरळीत पार पाडता येत नाही. अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे एका कर्मचाऱयास अतिरिक्त कार्यभार दिल्याने कामाच्या तणावामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे समोर येत आहे.

पोलीस बंदोबस्तात सिंचन

नीरा उजवा कालवा फलटण विभाग यांच्याकडे असलेली सांगोला पोलीस ठाण्याकडील सात लाख व पंढरपूर पोलीस ठाणे तीन लाख 30 हजार रुपयांचे बंदोबस्त शुल्क जमा करण्यात आले आहे. सध्या उन्हाळी आवर्तन सुरू असून, सिंचन वेळेत पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. याबाबतची मागणी पंढरपूर, तसेच सांगोला पोलीस ठाण्याकडे करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात सिंचन व्यवस्थितरीत्या पूर्ण करू.

– शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता