शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न त्यांनी संसदेत मांडले? निलेश लंकेंचा विखेंना प्रश्न

लोकसभेत लोकांचे प्रश्न आपण किती तळमळीने मांडतो याला महत्त्व असून गेल्या पाच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न संसदेत मांडले याचे उत्तर द्यावे अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळून केली. तालुक्यातील करंजी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफीक शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे,उषाताई कराळे,सरपंच नसीम शेख, उपसरपंच सुनिल अकोलकर, राजेंद्र पाठक, जालिंदर वामन, अभय गुगळे, मारुती क्षेत्रे, बाबासाहेब क्षेत्रे, सुरेश साखरे हे उपस्थित होते. या वेळी बोलताना लंके म्हणाले की, मोठ्या घरातला माणूस म्हणून मागच्या वेळेस निवडून दिले. मात्र गेल्या पाच वर्षात यांनी कोणतेच काम केले नाही. ते आले फक्त डाळ व साखर वाटायला. हे वाटप सुद्धा त्यांना माझ्यामुळेच करायला लागले. लोकांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या माणसाला भाषेची अडचण येत नाही. तुम्ही लोकसभेत किती तळमळीने प्रश्न मांडतात ते महत्वाचे आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर यांनी कधी संसदेत आवाज उठवला नाही. कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून भाषणात टाळ्या घेतल्या. प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठलीच नाही.’

‘किती मेडिकल कॉलेज नगरला आणले? तुमचे आजोबा, पणजोबा, खासदार आमदार, मंत्री होते तुम्ही एक तरी उद्योग नगरला आणला का.नगरची एमआयडीसी मरणासन्न झाली आहे. तिथे उद्योग सुद्धा कोणी आणत नाही. जी कामे केली ती सर्व उत्तरेत केली अन खासदार म्हणून केवळ दक्षिणेत मिरवण्याची काम केले. सुपा एमआयडीसी मध्ये आलेल्या उद्योजकांचे आम्ही स्वागत करत त्यांना सुविधा दिल्याने आज मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आल्या आहेत. गेल्या चार वर्षात यांना पाथर्डी नगरचा रस्ता करता आला नाही. आम्ही उपोषणाला बसलो तर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या आंदोलनाकडे जाऊ नका असे सांगितले. मात्र आम्ही ठाम राहिल्याने या रस्त्याचे काम सुरु झाले. हे काम सुरु झाले हीच आमच्या कामाची पावती आहे. हा रस्ता जेव्हा खराब होता त्या वेळी हे हेलिकॉप्टरने फिरत असल्याचे जनतेने पहिले आहे. मी प्रामाणिक माणूस असून प्रामाणिकपणे काम करत असल्यानेच मला या निवडणुकीत तुम्ही साथ द्या असे आवाहन शेवटी लंके यांनी केले. प्रास्ताविक रफीक शेख यांनी तर आभार उपसरपंच सुनिल अकोलकर यांनी मानले.