माझा गेम करण्याचा कट रचला होता! फडणवीसांवर नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

राज्यातील सत्तासंघर्षावेळी शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेल्या नितीन देशमुखांचा गेम करण्याचा देवेंद्र फडणवीसांनी प्लॅन रचला होता असा धक्कादायक आरोप खुद्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. शिंदे गटातील एका आमदारानेच मला ही माहिती दिली. त्याने सांगितलं की, तुम्ही ज्यावेळी सुरतमध्ये होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: तुम्हाला ठार मारण्याचे षडयंत्र रचलं होतं. शिंदे गटासोबत सत्तास्थापन करण्याच्या प्लॅनमध्ये मी अडथळा ठरत असल्यानं फडणवीस यांना माझा गेम करायचा होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुरतमध्ये असताना मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावाही नितीन देशमुख यांनी केला आहे.

शुक्रवारी अकोल्यात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टी करताना विचार करायला पाहिजे. वेळ आल्यावर आम्ही अशा लोकांचा हिशेब चुकता करू. आम्ही मरणाला न घाबरणाची माणसे आहोत, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.