‘अर्थव्यवस्था आजारी, पण भाजपच्या डॉक्टरांना त्याची पर्वा नाही’; पी चिदंबरम यांनी पाजले कडू डोस

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आणि भारतीय अर्थव्यवस्था ‘गंभीर आजारी’ असल्याची टीका केली आहे. त्यासोबतच आरोप केला की ‘भाजपचे तथाकथित डॉक्टर’ कोणती काळजी करत नाहीत.

चिदंबरम यांनी गुरुवारी X वर एका पोस्टमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या ‘2023-24 मध्ये मजबूत आरोग्य’ असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी निव्वळ परकीय थेट गुंतवणुकीत (एफडीआय) 31 टक्क्यांची घसरण झाल्याचं सांगितलं. ही घसरण त्यांच्या मते, परदेशी गुंतवणूकदारांच्या देशावर, सरकारवर आणि त्याच्या धोरणांवर असलेल्या ‘विश्वासाचे मोजमाप’ आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात भाजपचे नेते विविध दावे करत असतात. त्याला देखील चिदंबरम यांनी लक्ष्य केलं. ‘भाजप स्वतःला प्रमाणपत्र देते. पण अशी प्रमाणपत्रं परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांकडून आली पाहिजेत’, असं चिदंबरम म्हणाले.

‘व्याजदर जास्त आहेत, वास्तविक वेतन स्थिर आहे, बेरोजगारी वाढत आहे. गंभीर संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेची ही निश्चित चिन्हे आहेत. पण भाजपच्या तथाकथित डॉक्टरांना समजत नाही किंवा त्यांना त्याची पर्वा नाही’, असा असा आरोप देखील त्यांनी केला.

गेल्या तीन वर्षांत देशातील गुंतवणूकदारांनी भाजप सरकारच्या धोरणांवर अविश्वास व्यक्त केला आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी आरोप देखील केला की, ‘म्हणूनच अर्थमंत्र्यांना (निर्मला सीतारामन) त्यांना ताकीद द्यावी लागली आणि जेव्हा ते अयशस्वी झाले तेव्हा त्यांना त्यांची गुंतवणूक वाढवण्याची विनंती करावी लागली!’

चिदंबरम पुढे म्हणाले की विदेशी गुंतवणूकदारांना भाजपची ‘चुकीची धोरणे’ आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अक्षम व्यवस्थापन’ लक्षात आलं आहे. म्हणूनच ते पैसा बाहेर काढत आहेत आणि देशात गुंतवणूक आणत नाहीत’, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर आता चर्चा होऊ लागली असून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्ला तीव्र केला आहे.