आता रडायचं नाही, लढायचं! भावनिक राजकारण करणाऱ्यांना प्रतिभा धानोरकराचं प्रत्त्युतर

चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर केला. त्यानंतर कार्यकर्त्यांची जाहीर सभा त्यांनी घेतली. मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थक या सभेला आणि मिरवणुकीला हजर होते. या सभेवेळीच त्यांनी भावनिक राजकारण करणाऱ्या भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

रखरखीत उन्हात झालेल्या जाहीर सभेला आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, माजीमंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामन कासावर यांची उपस्थिती. जिल्ह्याचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना यावेळी प्रकर्षाने जाणवत होती. भावनिक आणि जातीय प्रचार करण्याचा विरोधकांनी जो प्रयत्न चालवला आहे, त्याला यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी उत्तर दिले. आता रडायचे नाही, तर लढायचे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अनिच्छेने एखाद्या नवरदेवाला लग्नाच्या मंडपात बसल्यावर ते लग्न टिकत नाही आणि संसार मोडतो, अशा नवरदेवासारखी केविलवाणी परिस्थिती सुधीर मुनगंटीवार यांची झाली, असा हल्ला चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चढवला.