याला म्हणतात नशीब! उमेदवारीसाठी साठमारी सुरू असताना एका उमेदवाराला दोन पक्षांकडून मिळाले तिकीट…

राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता प्रचाराने वेग घेतला आहे. अनेक पक्षातील नेते आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाह पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावत आहेत. त्याचप्रमाणे मिळेल त्या मार्गाने तिकीट मिळवण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. तरीही तिकीट मिळवण्यास अपयश आल्यास बंडखोरीचा बडगा उगारत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. अशा उमेदवारीसाठी साठमारी सुरू असताना एका उमेदवाराला दोन पक्षांनी उमेदवारी दिल्याने राजस्थानच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यानंतर काही वेळातच आणखी पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात एक असाही उमेदवार आहे की, ज्यांना दोन पक्षांकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यात एका उमेदवाराला दोन पक्षांकडून तिकीट मिळाल्याने त्याचे नशीब फळफळले आहे. या उमेदवाराचे नाव इमरान खान आहे. ते तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसने मंगळवारी जाहीर केलेल्या चौथ्या यादीत इमरान खान यांचा समावेश आहे. काँग्रेसने त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघाची जागा दिली आहे. त्यांचा मुकाबला भाजपचे खासदार बाबा बापलकनाथ यांच्याशी होणार आहे. इमरान यांना महिन्याभरापूर्वीच बसपाने तिजारा येथूनच तिकीट दिले होते. ही जागा इमरान जिंकणारच असा विश्वास असल्याने त्यांना बसपाने तिकीट दिले होते. बसपाकडून तिकीट मिळाल्यानंतर इमरान यांनी धडाक्यात प्रचारालाही सुरूवात केली होती.

प्रचारादरम्यानच ते काँग्रेसच्या संपर्कात आले आणि काँग्रेसनेही त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले. राजस्थानातील राजकीय वातावरण बघता पुन्हा काँग्रेसच सत्तेत येणार असल्याची शक्यता असल्याने इमरान यांनी काँग्रेसच्या पारड्यात उडी घेतली. मंगळवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत इमरान यांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर बसपाने इमरान यांची उमेदवारी रद्द केली आहे. इमरान यांच्यासारखा खात्रीने जिंकणारा उमेदवार काँग्रेसकडे गेल्याने बसपाने आता या जागेसाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.