माढा, सातारा लोकसभा मतदारसंघांनंतर सांगलीतही भाजपमध्ये बंडाळी

माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघांनंतर आता सांगलीमध्येही भाजपमध्ये बंडाळी झाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच भाजपमधील बंडाळी उफाळून आली आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट आणि उघडपणे उमेदवारीला विरोध करीत गटबाजीचा नारळ फोडला. आता छुप्या संघर्षाचे पाटही पक्षात वाहू लागले आहेत. त्यामुळे मैदानात उतरून प्रतिस्पर्धीचा सामना करण्यापूर्वी भाजपसमोर अंतर्गत बंडाळी थांबविण्याचे आव्हान आहे.

सांगली जिह्यात भाजपमध्ये गेल्या पाच वर्षांत वारंवार गटबाजी उफाळून आली. कधी पदाधिकारी निवडीतून, तर कधी नव्या-जुन्या नेत्यांमध्ये दुजाभाव होत असल्याच्या कारणावरून, कधी संस्थांमधील वर्चस्व वादातून गटबाजीच्या ठिणग्या उडत राहिल्या. आता लोकसभेचा उमेदवार जाहीर होताच गटबाजीला उधाण आले आहे. भाजपाचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय पाटील यांच्यावर उघड टीका करीत ‘‘आम्हाला ही उमेदवारी मान्य नाही,’’ असे थेट पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यानंतर खासदार संजय पाटील गटातील दोन जिल्हा उपाध्यक्षांनी जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली.

लोकसभेचे उमेदवार संजय पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यातील हा वाद पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा किस्सा बनतो की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र या दोघांच्या वादात अद्याप एकाही नेत्याने मध्यस्थीची भूमिका घेतलेली नाही.