ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी कवडीमोलाने लाटलेल्या जमिनी परत करा; शेतकऱ्यांचे रत्नागिरीत बेमुदत धरणे आंदोलन

ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी 1975 साली शेतकऱ्यांकडून 1200 एकर जमीन प्रति गुंठा 25 ते 40 रूपये कवडीमोल भावाने खरेदी करत शेतकऱ्यांच्या कुटूंबातील दोघांना नोकरी देण्याचे आश्वासन देत फसवणूक करण्यात आली. अद्याप एकही प्रकल्प त्या जमिनीवर आला नसून शेतकऱ्यांना ती जमीन परत करावी किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीचा मोबदला द्यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

1982 साली ॲल्युमिनियम प्रकल्पाने गाशा गुंडाळला. त्यानंतर सर्व संपादित जमीन एमआयडीसीच्या ताब्यात हस्तांतरीत करण्यात आली.आजतागायत त्या जमिनीवर एकही प्रकल्प आलेला नाही. भांडवलदारांच्या मर्जीने या जमिनीवर निवासी बंगले उभारण्यात आले आहेत. 835 शेतकऱ्यांना भूमिहीन केले आहे. या परिसरात बेकायदेशीर बंगले बांधण्यात आले आहेत. या जमिनी शेतकऱ्यांना परत करा किंवा आजच्या बाजारभावाने जमिनीचा मोबदला द्या,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .यावेळी ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.