सामना अग्रलेख – द्रविड विरुद्ध सनातन

जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मांत आहे. सनातन धर्म गाईला देवतामाता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडीजानव्याचे, घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही. याउलट भाजपचे आहे. ते निवडणुकीत रामबजरंग बली आणतात लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणूनसेंगोलआणतात. हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे. समाजाला जुन्याच परंपरांत अडकवणारासनातनीविचार नव्या पिढीस मान्य नाही. धर्म तसाच राहील. जुनाट परंपरा, रूढी, विषमतेची जळमटे गळून पडतील. उदयनिधी स्टालिन, रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही. त्यांचे पुतळे लोकांनी तोडले, पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे. राहील!

हिंदू धर्म हा एक पृथ्वीतलावरील सगळय़ात जुना धर्म आहे. 5 हजार वर्षांपूर्वी हा धर्म स्थापन झाला. अनेक संकटे, वादळे, घाव अंगावर झेलून या धर्माची पताका फडकत आहे. त्यासाठी महाभारत काळापासून अगणित लोकांनी बलिदाने दिली आहेत. तलवारीच्या आणि तागडीच्या जोरावर हा सनातन धर्म विकलांग करण्याचा प्रयत्न झाला, पण धर्माची पताका फडकत आहे. त्यामुळे तामीळनाडूचे एक मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माविषयी तोडलेले तारे अज्ञानाच्या अंधारात लुप्त झाले आहेत. उदयनिधी काय म्हणाले? ‘‘सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवूनच टाकावे लागते. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. ते आपल्याला संपवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सनातन धर्मालाही संपवायचे आहे.’’ उदयनिधी यांचे हे विधान त्यांच्या ‘द्रविडी’ भूमिकेशी तर्कसंगत असले तरी देशातील 80-90 कोटी हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांच्या बजरंगी बगलबच्च्यांना तर उदयनिधींच्या वक्तव्याने उकळय़ाच फुटल्या. उदयनिधींना उत्तर त्याच भाषेत द्यायला हवे. ते देण्याचे सोडून ‘इंडिया’ आघाडी आता उदयनिधींवर काय भूमिका घेणार? शिवसेनेचे यावर काय धोरण आहे? वगैरे प्रश्न विचारले गेले. शिवसेनेची भूमिका ही जुनीजाणती म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच आहे व राहणार. ममता बॅनर्जींपासून केजरीवाल, काँग्रेस वगैरे लोकांनीही उदयनिधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दोष तर सर्वच धर्मांत आहेत, पण हिंदू धर्माने हे दोष दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले. सतीची चाल, अस्पृश्यता, विषमता, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर हिंदू धर्माने प्रगतशील भूमिका घेतली. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या लाखो बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग केला. धर्मातील

स्पृश्यअस्पृश्यता

आणि रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांनी बंड केले. या बंडापासून सनातन धर्माने धडा घेतला व सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले. धर्म जागच्या जागीच आहे; पण अस्पृश्यता, रूढी-परंपरांना मलेरिया, डेंग्यूप्रमाणे आपण खतम केले. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे. दुसरे असे की, द्रविड विरुद्ध सनातन हा संघर्षाचा इतिहासही जुनाच आहे. त्याच संघर्षातून दक्षिणी लोकांचा हिंदी विरोध वाढला. ते हिंदू धर्म, त्यांचे देव, परंपरा मानायला तयार नाहीत. ‘द्रविडी’ पक्षाचा पायाच ब्राह्मणवादाच्या विरोधाचे प्रतीक म्हणून घालण्यात आला. द्रविडी लोकांचे अंत्यसंस्कार हे दहन नव्हे, तर दफन पद्धतीने होतात. जयललिता, उदयनिधी स्टालिनचे आजोबा करुणानिधी यांचेही दफन करण्यात आले. तामीळनाडूत सनातन विरोध इतका टोकाचा आहे की, तेथे ‘पौर्णिमे’ऐवजी अमावास्येला मंगल कार्ये, उद्घाटने, शुभारंभ केले जातात. अशा द्रविडी स्थानातून सनातन धर्मास विरोध होणे ही बाब आश्चर्यकारक नाही. जातीयता, आर्थिक भेदभाव व अस्पृश्यता या चिडीतून दक्षिणेत सनातनविरोधात ठिणगी पडली. तशी ती वारंवार महाराष्ट्रातही पडली. भिक्षुकशाही, राजकीय-सामाजिक पेशवाई, जाती-प्रथा याविरोधात महाराष्ट्राने सतत बंड केले. मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाकारला तेव्हा ब्राह्मण असलेल्या साने गुरुजींनी उपोषण आरंभले. जातीयतेचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज जातपात मानत नव्हते. त्यांचे सैन्य, अष्टप्रधान मंडळाची रचना तेच दर्शवते. त्यामुळे द्रविडी नेत्यांचा सनातन विरोध हा अज्ञानावर आधारित आहे व ते त्यांचे प्रांतीय राजकारण आहे. 1924 मध्ये केरळमधल्या त्रावणकोर येथील राजाच्या

मंदिरात येण्याजाण्याच्या

रस्त्यावर दलितांना प्रवेशबंदी करण्यात आली. त्यातून दलितांनी बंड केले. राजाने ते आंदोलन दडपून टाकले. तेव्हा ई. व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार यांनी त्या आंदोलनात उडी घेतली. त्यांनी दीर्घकाळ दलितांच्या हक्कासाठी लढा दिला. तुरंगवास भोगला. पेरियार यांच्याप्रमाणे अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे अनेक कर्ते पुरुष हिंदू धर्मात निर्माण झाले. महाराष्ट्रात डॉ. आंबेडकरांच्या चळवळीस उच्च वर्णीयांचा सक्रिय पाठिंबा होताच. महाडच्या चवदार तळय़ाचा संघर्ष करण्यामागे सुरबा नाना टिपणीस होते. आगरकर, फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जोतिबा फुले, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या चरित्रांचे पारायण उदयनिधींनी करायला हवे. बाबा आमटे यांनी जातपात न पाहता कुष्ठ रोग्यांना नवे जीवन दिले. जगात असे उदाहरण नसेल. महाराष्ट्राची संतपरंपरा ही सनातनी असली तरी सामाजिक सुधारणा स्वीकारणारी होती. जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. प्रत्येक धर्मात पाखंडाचा अंश आहे. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मांत आहे. वीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी, पण त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता. सनातन धर्म गाईला देवता-माता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडी-जानव्याचे, घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही. याउलट भाजपचे आहे. ते निवडणुकीत राम-बजरंग बली आणतात व लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणून ‘सेंगोल’ आणतात. हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे. समाजाला जुन्याच परंपरांत व जोखडात अडकवणारा ‘सनातनी’ विचार नव्या पिढीस मान्य नाही. धर्म तसाच राहील. जुनाट परंपरा, रूढी, विषमतेची जळमटे गळून पडतील. उदयनिधी स्टालिन, रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही. त्यांचे पुतळे लोकांनी तोडले, पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे. राहील!