सामना अग्रलेख – कोरोनाचे शुक्लकाष्ठ!

‘डब्लूएचओ’ने आता जो खुलासा केला आहे त्यानुसार कोरोनाचा संसर्ग पाण्यातूनदेखील होण्याचा धोका आहे. थायलंड आणि स्वित्झर्लंडमध्ये कोरोनाचा ‘बीए. 2.86’ हा नवा ‘अवतार’ पाण्यात सापडला आहे. ब्रिटनमध्ये ‘एरिस’ या कोरोनाच्या उपप्रकाराचा उद्रेक झाला आहे. अमेरिकेतही कोरोनाची नवी लाट धडका देत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काहीच दिवसांपूर्वी ‘अज्ञात एक्स’ रोग हे भविष्यात कोरोनापेक्षाही भयंकर अशा जागतिक महामारीचे कारण असू शकते, असा इशारा दिला होता. ही महामारी येईल तेव्हा येईल, पण कोरोनाचे शुक्लकाष्ठ कधी सुटणार, हा प्रश्न जगाला पडला आहे आणि त्याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही.

कोरोनाने जगाचा पिच्छा सोडला असे वाटत असतानाच या विषाणूचे भूत पुन्हा एकदा बाटलीतून बाहेर आले आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. एवढेच नव्हे तर ‘कोविड-19’ च्या उद्रेकासाठी तयार राहा, असा इशाराच तेथील तज्ञांनी अमेरिकन सरकार आणि जनतेला दिला आहे. मागील काही दिवसांत ज्या पद्धतीने अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यांचे इस्पितळात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यावरून तज्ञांनी दिलेला इशारा गंभीरच म्हणावा लागेल. तेथील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टच्या तीन आठवडय़ांत अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे इस्पितळात दाखल होण्याचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढले. आता ऑगस्ट संपला आहे. म्हणजे मागील दोन आठवड्यांत या संख्येत आणखी वाढ झाली असणार, हे निश्चित आहे. प्रामुख्याने अमेरिकेतील पश्चिम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. कोरोनाच्या या नवीन लाटेमुळे तेथील शाळा, कामाची ठिकाणे, स्थानिक प्रशासकीय कामकाज या सर्वांवर परिणाम झाला आहे. जे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत किंवा झालेले नाहीत, त्यांच्यात

कोरोनाची गंभीर लक्षणे

नाहीत ही दिलासा देणारी गोष्ट आहे, तथापि संसर्गाचा वेग जास्त आहे आणि हीच चिंतेची बाब आहे. ज्या भागात हा संसर्ग वाढत आहे तेथील विद्यार्थी नुकतेच शाळांमध्ये परतले आहेत. त्याआधी झालेली उन्हाळी शिबिरे ही कोरोनाची हॉट स्पॉटस् ठरली होती. त्यामुळे आता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेशिवाय जगातील इतर काही देशांमध्येही कोरोनाच्या नवीन उपप्रकाराने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्याचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही तेथे झपाटय़ाने वाढत आहे. या व्हेरियंटला ‘ईजी. 5.1’ असे संबोधले जात असून ‘एरिस’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. कोरोनाची तिसरी-चौथी लाट जगात ज्या ‘ओमायक्रॉन’ या कोविड-19 विषाणूच्या प्रकाराने आणली होती त्या ओमायक्रॉनचे ‘एरिस’ हे म्युटेशन आहे. ब्रिटनमधील प्रत्येक सात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एक रुग्ण ‘एरिस’ची लागण झालेला आढळून आला आहे. त्यामुळेच इतरही देशांमध्ये ‘एरिस’चा प्रादुर्भाव होऊन कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका आहे. पुन्हा ‘डब्लुएचओ’ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूबाबत

अलीकडेच एक धक्कादायक खुलासा

केला आहे. ‘डब्लूएचओ’ने केलेल्या एका अभ्यासातून जो निष्कर्ष समोर आला आहे तो अधिकच गंभीर आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या ‘कोविड-19’ विषाणूने आणि नंतर त्याच्या काही उपप्रकारांनी जगभरात हाहाकार माजवून कोटय़वधी लोकांचा बळी घेतला होता त्या विषाणूचा संसर्ग फक्त हवेतूनच आणि त्यातही निकटच्या संपर्कातून होत होता. मात्र ‘डब्लूएचओ’ने आता जो खुलासा केला आहे त्यानुसार कोरोनाचा संसर्ग पाण्यातूनदेखील होण्याचा धोका स्पष्ट झाला आहे. थायलंड आणि स्वित्झर्लंडमध्ये कोरोनाचा ‘बीए. 2.86’ हा नवा ‘अवतार’ पाण्यात सापडला आहे. ब्रिटनमध्ये ‘एरिस’ या कोरोनाच्या दुसऱया उपप्रकाराचा उद्रेक झाला आहे. तिकडे अमेरिकेतही कोरोनाची नवी लाट धडका देत आहे. जगावरील कोरोनाचे संकट दूर झाले असे वाटत असतानाच त्या विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने काहीच दिवसांपूर्वी ‘अज्ञात एक्स’ रोग हे भविष्यात कोरोनापेक्षाही भयंकर अशा जागतिक महामारीचे कारण असू शकते, असा इशारा दिला होता. ही महामारी येईल तेव्हा येईल, पण कोरोनाचे शुक्लकाष्ठ कधी सुटणार, हा प्रश्न जगाला पडला आहे आणि त्याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही.