नाबार्ड स्थानीय लोकाधिकार समिती आयोजित शिवजयंती उत्साहात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत नाबार्ड स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने नाबार्ड मुख्य कार्यालय, वांद्रे येथे आयोजित शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शिवकालीन शौर्यकथांच्या माध्यमातून शिवकालीन प्रेरणादायी इतिहासाच्या आठवणी जागवल्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शिंदे तर सन्माननीय पाहुणे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्यासह नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक भारद्वाज,  युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस मनोहर बने उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस ज्ञानेश्वर संकपाळ म्हणाले, ‘असा थोर राजा झाला नाही आणि होणारही नाही.’ यानंतर महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर म्हणाले की, ‘नेव्हीचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना  ओळखले जाते. त्यांची न्यायव्यवस्था सर्वांना समान न्याय देत होती. सर्वांना सोबत घेऊन जाणारा राजा ही त्यांची जगात ओळख आहे. तर आमदार सुनील शिंदे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज जगाला गरज आहे. असा नितीवान, चारित्र्यवान राजा जगात झाला नाही.’ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर संकपाळ, अध्यक्ष कृष्णा घाटकर, उपशाखाप्रमुख दिगंबर वराडकर, सचिव प्रमोद कदम, किशोर सावंत, यशवंत भांडे, सुनील जाधव, विलास दळवी, बाळकृष्ण गुरव यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन एन. एस. फाठक यांनी केले.