मोदींची स्वतःची गॅरंटी नाही, ते कसली गॅरंटी देतात? संजय राऊत यांचा टोला

रामटेकमध्ये आम्ही प्रचाराची सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष लढत असला तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या पक्षासोबत आहोत. आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोदी गॅरंटी यावरही त्यांनी भाजप आणि मोदी यांना जबरदस्त टोला लगावला.

परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. राज्यात आम्ही वेगळे पक्ष म्हणून नाही, तर महाविकास आघीड म्हणून एकत्र आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 100 टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहे. देवेंद्र फडणवीस भाजपला 45 प्लस जागा मिळतील असे सांगत आहेत. त्यांना आकडे लावायची सवय असेल, निवडणुकीनंतर त्यांना तेच काम करावे लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी विजय मिळवणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशभरात इंडिया आघाडील 305 जागा मिळतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडील 35 प्लस जागा मिळतील, असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी स्वतः निवडून येण्याची गॅरंटी नाही, अशी परिस्थिती असताना त्यांच्या गॅरंटीला कोण विचारतेय, असा सवालही त्यांनी केला.

प्रभी श्री रामावर असलेले त्यांचे प्रेम नकली आणि राजकीय ढोंगाचे आहे. कोणत्याही लढ्यात किंवा संघर्षात ते नव्हते. त्यामुळे प्रभू श्री राम त्यांच्या पाठिशी नाही. मैदानात उभए राहून जे आत्मविश्वासाने लढतात, राम त्यांनाच पावतो. निवडणुकीच्या आधी दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे तपासयंत्रणांच्या चौकशा लावल्या जात आहेत. त्यांना तुरुंगात टाकण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांनाही त्यांना भेटू दिले जात नाही. तुरुंगात त्यांना यातना दिल्या जात आहेत. आम्ही हे सर्व भोगले आहे. सर्व पक्ष एकजुटीने मोदी सरकारविरोधात प्रचारात उतरले तर त्यांना 100 जागा जिंकणेही कठीण होईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. देशभरात प्रादेशिक नेत्यांसोबत काँग्रेस नेते राहुल गांधी व्यासपीठावर दिसणार आहेत. त्याचा प्रभाव नक्कीच दिसणार आहे. तसेच जनतेचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावरून देशातील जनमत स्पष्ट होत आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत ठरलेल्या उमेदवाराविरोधात कोणी काम करत असेल, आघाडीच्या निर्णयाविरोधात कोणी जात असेल, बंजखोरी करत असेल, तर संबिधितांवर त्या पक्षाने कारवाई करण्याची गरज आहे, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले. कोणाची ताकद किती आहे किंवा कोण काय आहे, त्याचा निर्णय जनता निवडणुकीत करणार आहे. भाजपला तुल्यबळ टक्कर द्यायची असेल तर सांगलीत शिवसेनेचाच उमेदवार हवा, हे आमचे धोरण आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.