जामसंडेतील दुकानाला मध्यरात्री आग; दुकानातील साहित्य आगीत जळून खाक

जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला बुधवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आणि दुकानाचे मालक पटेल बंधूंनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे विनोद पटेल यांच्या दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे.

पटेल नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री 8 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास भगवती ट्रेडर्स दुकानावरील मजल्यावरील रहिवाशांनी त्यांना दुकानात आग लागल्याची माहिती दिली. दुकानाच्या ग्रीलमध्ये पाण्याच्या टाक्या आणि इतर सामान असल्यामुळे आत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे पटेल बंधू येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती नगरपंचायत प्रशासनाला मिळतात नगरपंचायतीचे कर्मचारी अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत त्यांच्या दुकानातील अनेक साहित्य जळून खाक झाले होते.