स्मार्ट गुंतवणूकदार – गरज ‘बिहेव्हिअरल फायनान्स अभ्यासाची

>>कौस्तुभ खोरवाल, प्राध्यापक आणि गुंतवणूक तज्ञ

पैशाचे व्यवस्थापन करताना व्यक्तीची मानसिकता महत्त्वाची असते. अगदी छोटी वाटणारी दर महिन्याला होणारी गुंतवणूक भविष्यात मोठा निधी निर्माण करू शकते. त्यासाठी आपल्या मनात गुंतवणूक पर्यायाबाबत स्पष्टता आणि गुंतवणुकीचे सातत्य गरजेचे असते.

बँक, आयटीचा विचार

सध्या शेअर बाजार तेजीत आहे. त्यामुळे आपण बचत केलेल्या पैशातून बँक, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विकत घेतल्यास गुंतवणूक परतावा अधिक मिळण्याची संभाव्यता सर्वात अधिक आहे. उदाहरणार्थ – एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, विप्रो, टीसीएस, अशोक ले-लॅन्ड, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा इत्यादी.

सध्याच्या काळात स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी बिहेव्हिअरल फायनान्सचा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण घरातील आर्थिक बजेट सांभाळताना होणारी कसरत कोणालाही नवीन नाही. त्यामुळे गुंतवणूक पर्याय निवडताना अनेक विचार मनात गोंधळ निर्माण करतात. त्या विचारात सुसूत्रता आणण्यासाठी बिहेव्हिअरल फायनान्समधील मुख्य सिद्धांत जाणून घेण्यास सुरुवात करत आहोत. आज आपण बिहेव्हिअरल फायनान्समधील ‘संभाव्यता दर्शक सिद्धांत’ याबद्दल जाणून घेणार आहोत.

संभाव्यता दर्शक सिद्धांत –

संभाव्यता दर्शक सिद्धांत अधिक परतावा देणाऱया योग्य गुंतवणूक पर्यायावर लक्ष केंद्रित करतो. येथे ‘अधिक परतावा’ हा शब्द गुंतवणूक मूल्य वाढ स्वरूपात पहावा. पैसाच पैसा निर्माण करतो. योग्य गुंतवणूक पर्याय निवड केल्यामुळे गुंतवणूक करण्याची सवयदेखील लागते. एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न कमी असल्यास प्रथम छोटे घर (वन-रूम किचन) विकत घेतो, पण भविष्यात हीच व्यक्ती मोठे घर विकत घेणार ही संभाव्यता (शक्यता) कोणीही नाकारणार नाही. कारण व्यक्तीची स्वतःचे घर घेण्याची मानसिकता छोटे घर घेताना निर्माण झाली आहे.

जर तुम्हाला गुंतवणुकीतून परतावा मिळण्याचे दोन पर्याय दिले, ज्यामध्ये पहिल्या गुंतवणूक पर्यायातून दहा हजार मिळण्याची शक्यता 80 टक्के आहे आणि दुसऱया गुंतवणूक पर्यायातून आठ हजार मिळण्याची शक्यता 100 टक्के आहे, तर तुम्ही कोणता गुंतवणूक पर्याय निवडाल? आपले मन जर दुसऱया पर्यायाकडे वळत असल्यास तुम्हाला स्मार्ट गुंतवणूकदार स्वरूपात विचार करावा लागेल. योग्य गुंतवणूक पर्याय (सरकार आणि नियामक प्राधिकरणाच्या नियंत्रणात असलेला पर्याय) निवडल्यास अधिक परतावा मिळण्याची संभाव्यता अधिक दिसत असल्यास पहिला गुंतवणूक पर्याय निवडणे योग्य राहील.

थोडक्यात, या सिद्धांतानुसार केवळ हमी परतावा देणाऱया गुंतवणूक पर्यायावर लक्ष केंद्रित करू नये. इतर संभाव्य योग्य गुंतवणूक पर्याय निवडायचे आहे. म्हणजेच स्मार्ट गुंतवणूकदार व्हायचे आहे.

पारंपरिक गुंतवणूकदार स्वभावाची वैशिष्टय़े

 अनेक व्यक्तींनी निवडलेला पारंपरिक गुंतवणूक पर्याय योग्य मानणे.
 हमी परतावा पाहून गुंतवणूक पर्याय निवड करणारे.
 अधिक प्रमाणात तार्किक विचार करणारे.
 गुंतवणुकीतून मिळणारा हमी परतावा वैयक्तिक हौसमौज करण्यात खर्च करणारे.
 गुंतवणूक (ठेवी) आणि कर्ज यामध्ये प्रमाण बद्धता न ठेवणे.

स्मार्ट गुंतवणूकदार स्वभावाची वैशिष्टय़े

 स्वतःची गरज ओळखून गुंतवणूक पर्याय निवडणे.
 गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यावर अधिक भर देणे (शेअर्समधील गुंतवणूक).
 संपत्ती व्यवस्थापनावर भर देणे.
 उत्पादनक्षम कर्ज घेणे (व्यवसाय कर्ज आणि शैक्षणिक कर्ज).
 सोने किंवा शेअर बाजारातील घसरण गुंतवणूक संधी स्वरूपात पाहणे.