राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात दिले जाणार आहेत.

क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित केले जाईल. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत. समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.