मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात हजारो दिल्लीकर रस्त्यावर

ईडी, सीबीआयच्या आडून शिखंडी डाव टाकून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबणाऱया मोदी सरकारविरोधात आज हजारो दिल्लीकर आणि आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. इन्कलाब झिंदाबाद, केजरीवाल झिंदाबादच्या घोषणा देत दिल्लीतील परिसर अक्षरशः दणाणून सोडला. मोदी सरकारविरोधातील घोषणांची पोर्स्टर्स झळकवत दिल्लीकरांनी मोदी सरकारच्या दडपशाही आणि हुकूमशाहीला कडाडून विरोध केला. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मोदी सरकारने पोलीस बंदोबस्त वाढवला आणि पोलिसांनी अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांना फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये कोंबले.

आंदोलनाला घाबरलेल्या मोदी सरकारने दिल्लीत नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवून दिल्लीला अक्षरशः छावणी बनवून टाकल्याचा आरोप आपचे दिल्लीतील समन्वयक गोपाल राय यांनी आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

या नेत्यांना अटक

आपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ भारती, दिल्ली विधानसभेतील उपसभापती राखी बिर्ला आणि पंजाबचे मंत्री हरज्योत सिंह बैन्स यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या आडून आमचे आंदोलन मोदी सरकार दडपून टाकू शकत नाही, असा इशारा गोपाल राय यांनी यावेळी दिला. केवळ पुरूष कार्यकर्तेच नाही, तर महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये काsंबल्याचा दावा राय यांनी केला.

दिल्ली नाही, पोलीस राज्य

आंदोलनाची धार पाहून पोलिसांनी दिल्लीत 144 कलम लागू केले आणि दिल्लीचे अक्षरशः पोलीस राज्य करून टाकल्याचा आरोप आपचे नेते आणि दिल्लीचे समन्वयक गोपाल राय यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार होता. परंतु, त्यांच्या निवासस्थानाभोवती पोलीस बंदोबस्त वाढवून त्याचा किल्लाच केला होता. निमलष्करी दलही तैनात करण्यात आले होते.

पत्रकार संघटनांनी केला निषेध

आपने केलेल्या निदर्शनांचे वार्तांकन करणाऱया छायाचित्रकारांना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीचा प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि दिल्ली युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांनी निषेध केला आहे. या प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणीही या संघटनांनी केली आहे. द वर्किंग न्यूज कॅमेरामन्स असोसिएशनने काही पोलीस अधिकारी पत्रकारांचा गळा धरून धमकावत असल्याची छायाचित्रेही प्रसृत केली आहेत.

हुकूमशाहीविरोधात रविवारी महारॅली

मोदी सरकारच्या दडपशाही आणि हुकूमशाहीविरोधात तसेच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ येत्या रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती गोपाल राय यांनी दिली. यावेळी इंडीया आघाडीतील नेत्यांच्या एकीची वज्रमुठ मोदी सरकारला दिसेल. हुकूमशाहीचा विरोध असणाऱयांनी आणि लोकशाही तसेच राज्यघटनेवर प्रेम करणारे लाखो नागरिक या आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास राय यांनी व्यक्त केला.

भाजप कार्यकर्त्यांवर केवळ पाण्याचा फवारा

केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भाजपा नेते, कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांवर केवळ पाण्याचा फवारा मारण्यात आला. एकीकडे आपच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांवर, दिल्लीकरांवर अमानुष हल्ला तर दुसरीकडे भाजप नेते, कार्यकर्त्यांवर केवळ पाण्याचा फवारा असे चित्र होते.