जगाच्या पाठीवर – होळी

>>तृप्ती मोडक

होळी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. मराठी महिन्यातील शेवटच्या फाल्गुन महिन्यात हा सण साजरा होतो. देशभरात, जगभरात जिथे जिथे हिंदू आहेत, तिथे तिथे हा सण साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी हा सण साजरा करण्याची पद्धत खूप आकर्षक आहे.

पहिल्या दिवशी मनातील वाईट प्रवृत्ती, विचार जाळून टाकण्याचे प्रतीक म्हणून होलिकादहन होते. काही ठिकाणी शिव्या देऊन मनातील वाईट विचार पूर्णपणे काढून टाकण्याची प्रथा आहे. दुसऱया दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगपंचमी साजरी केली जाते. या सणाला धूलिवंदन तर काही ठिकाणी शिमगाही म्हटले जाते.

हिरण्यकश्यपू राजा खूप अहंकारी होता. त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णुभक्त. हिरण्यकश्यपूला ते आवडत नसे. हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला घेऊन अग्नीवर बसायला सांगितले. कारण होलिकेला अग्नीपासून वाचण्याचा वर होता. वरदान होते. पण त्या वराचा दुरुपयोग करायचा नाही अशीही अट होती, पण होलिकेने त्या वराचा दुरुपयोग केला.

भक्त प्रल्हादला विष्णूच्या वरदानाने जराही चटका बसला नाही, पण होलिकेने त्या वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे ती आगीत भस्म झाली. तेव्हापासून होलिकादहन हा सण साजरा केला जातो.