ऑटोमोबाईल वाहतुकीमधून मध्य रेल्वे झाली मालामाल, सात महिन्यांत 120 कोटी रुपयांचा महसूल

प्रवासी वाहतुकीसोबत मध्य रेल्वे मालवाहतुकीच्या माध्यमातूनदेखील घसघशीत कमाई करत आहे. 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने 1,01,443 ऑटोमोबाईल कार 708 रेकमध्ये ट्रान्सपोर्ट केल्या ज्यामधून मध्य रेल्वेला 120.18 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 36 टक्के अधिक आहे.

ऑटोमोबाईल उद्योगाच्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेची बांधिलकी चालू वर्षातील कामगिरीवरून दिसून येते. मुंबई विभागातील कळंबोली; नागपूर विभागातील अजनी; भुसावळ विभागातील नाशिक रोड; सोलापूर विभागातील दौंड आणि विलाड आणि पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथे वाहतुकीसाठी मोटारींचे लोडिंग करण्यात आले आहे. सर्वाधिक ऑटोमोबाईल लोडिंग ही पुणे विभागातून झाली आहे. या कालावधीत 491 रेकमध्ये 79,136 ऑटोमोबाईल्स लोड करून पुणे आघाडीवर आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती उद्योग इत्यादी ऑटोमोबाईल पंपन्या त्यांच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मध्य रेल्वेच्या सेवांचा लाभ घेतात.