70 वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी – महाराष्ट्राची गुजरातवर जोरदार चढाई; आकाश शिंदेच्या तुफानासमोर गुजरातचा बचाव कोसळला

पहिल्या सत्रात गुजरातच्या बचावफळीने महाराष्ट्राच्या चढाईपटूंना रोखत सनसनाटी निर्माण केली होती, मात्र दुसऱया सत्रात आकाश शिंदेच्या वादळी चढायांनी गुजरातच्या संरक्षणाच्या चिंधडय़ा उडवल्या आणि 70 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गुजरातवर 48-31 अशी जोरदार चढाई करत विजयी सलामी दिली. तसेच गतविजेते हिंदुस्थानी रेल्वे, हरयाणा, गोवा आणि तामीळनाडूने सहज विजयासह सलामी दिली.

आजपासून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने नगर जिह्याचे वाडिया पार्क कबड्डीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनीय लढतीत अस्लम इनामदारचा संघ भाव खाऊन गेला असला तरी गुजरातच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या चढाईबहाद्दरांच्या केलेल्या चढाया पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गुजरातच्या बचावपटूंनी केलेल्या जोरदार पकडींमुळे महाराष्ट्रावर पहिल्या दहा मिनिटांतच लोणची नामुष्की सहन करावी लागली. त्यामुळे गुजरात चक्क 13-9 असा आघाडीवर पोहोचला. ही आघाडी पटतच नव्हती. पहिल्या डावात महाराष्ट्राने चढायांमुळे तर गुजरातने पकडींच्या जोरावर आपला गुणफलक हलवला होता.

पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटापर्यंत गुजरात 19-18 असा एका गुणाने का होईना आघाडीवर होता. पण तेव्हाच अस्लमने केलेली जोरदार पकड आणि पुढच्याच सेकंदाला केलेल्या खोलवर चढाईने महाराष्ट्राला 21-19 अशी दोन गुणांची आघाडी मिळवून दिली.

पहिल्या सत्रात 19 व्या मिनिटांपर्यंत आघाडीवर असलेला गुजरात 20 व्या मिनिटाला पिछाडीवर पडला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या चढायांच्या हल्ल्यांना गुजरात रोखू शकला नाही. दुसऱया सत्रात महाराष्ट्राचे आक्रमक रूप दिसले. आकाश शिंदेने त्यांच्या संरक्षणाला वारंवार भेदत अक्षरशः खिळखिळे करून टाकले आणि त्यामुळे गुजरातला गुण मिळवणेच कठीण झाले. परिणामतः महाराष्ट्राने सामन्यावर आपली पकड घट्ट करत आपला विजय निश्चित केला.

दुसऱया डावात आकाशच्या चढाया इतक्या सुसाट होत्या की, गुजरातला एकदा नव्हे तर दोनदा लोण सहन करावे लागले. सोबत मयूर कदमच्या पकडीलाही गुजरातचे आक्रमक भेदू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्या सत्रात कडवा संघर्ष करणारा गुजरात दुसऱया सत्रात अक्षरशः केविलवाणा आणि हतबल दिसला. गुजरातकडे महाराष्ट्राच्या आकाश शिंदेच्या चढायांचे उत्तर नव्हते ना मयूर कदमच्या पकडीला भेदण्याचे तंत्र. आकाशने आपल्या 20 चढायांमध्ये 16 गुणांची कमाई करत महाराष्ट्राला अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार अस्लम इनामदार आणि आदित्य शिंदेचीही साथ लाभली. प्रथमच महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवत असलेला अस्लम काहीसा दबावाखाली खेळताना दिसला.

पहिला दिवस एकतर्फी सामन्यांचाच

राष्ट्रीय कबड्डीच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राला गुजरातने प्रारंभी धक्के दिले असले तरी अन्य सामन्यांत कबड्डीप्रेमींना एकतर्फी सामनेच पाहावे लागले. गतविजेत्या हिंदुस्थानी रेल्वेने तर दुबळय़ा बीएसएनएलची 40-07 असा धुळधाण उडवत आपले विजयी अभियान सुरू केले. दुसरीकडे गोव्याने बंगालचा 46-16 फडशा पाडला. तामीळनाडूने पुदुच्चेरीचा 38-29 असा पराभव केला तर हरयाणाने उत्तराखंडला 42-22 असे धुतले. हिमाचल प्रदेशने अर्धशतकी विजय नोंदविताना त्रिपुराचा 68-16 असा 52 गुणांनी पराभव केला. आज झालेल्या सामन्यात सेनादल, राजस्थान, कर्नाटकने आपल्या गुणांची पन्नाशी गाठत मोठय़ा विजयांची नोंद केली.

भाषणबाजीशिवाय उद्घाटन, आचारसंहितेचे मानले आभार

कबड्डीचे उद्घाटन म्हणजे जणू नेत्यांच्या भाषणांची मालिकाच. पण आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाला राजकीय मंडळी फार कमीच आली होती. त्यामुळे दोनवेळा आशियाई कबड्डी स्पर्धेत हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱया अशोक शिंदे यांनी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले. आचारसंहिता असल्यामुळे उद्घाटनाला भाषणबाजीही झाली नाही.  कबड्डीच्या इतिहासात भाषणबाजीशिवाय उद्घाटन झाल्याचीही पहिलीच वेळ असावी. भाषणबाजी बंद असल्यामुळे सामनेही वेळेवर सुरू झाले. तसा कबड्डीचा आणि वेळेचा फारसा संबंध नाही, पण आचारसंहितेमुळे सर्व काही शांतपणे आणि वेळेवर सुरू झाल्यामुळे कबड्डीप्रेमींनी चक्क आचारसंहितेचेच मनापासून आभार मानले.

आजच्या सामन्यांचे निकाल

चंदिगड – तेलंगणा (48-37), उत्तर प्रदेश- जम्मू-कश्मीर (45-22), सेनादल – ओडिशा (57-26), बिहार – मणिपूर (48-39), हिमाचल प्रदेश – त्रिपुरा (68-16), राजस्थान – झारखंड ( 55-11), कर्नाटक – छत्तीसगड (54-33), पंजाब – आंध्र प्रदेश (39-33), हरयाणा – त्रिपुरा (29-9), चंदिगड – छत्तीसगड (39-19).