महाराष्ट्राने दिल्ली जिंकली, आता बाद फेरीत महाराष्ट्राची गाठ विदर्भाशी

महाराष्ट्राने 27-15 अशा आघाडीनंतर केलेल्या ढिसाळ खेळामुळे दिल्लीने सामन्यात केलेल्या नाटय़मय खेळाने महाराष्ट्राच्या तोंडातून अक्षरशः फेस आणला होता, पण सामना संपायला अवघी पाच मिनिटे असताना दिल्लीच्या चढाईपटूच्या केलेल्या सुपर टॅकलने महाराष्ट्राच्या जिवात जीव आणला आणि कडव्या संघर्षाच्या दिशेने वळत असलेला सामना महाराष्ट्राने जिंकत दिल्ली जिंकल्याचा आनंद साजरा केला. आदित्य शिंदेच्या अचूक चढाया आणि संकेत सावंतच्या सुपर पकडींनी 70 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या विजयासह बाद फेरी गाठली असून आता त्यांची गाठ विदर्भाशी पडेल. तसेच गोवा, बिहार, हरियाणा, तामीळनाडू, चंदिगड यांनीही साखळीत सलग दोन विजय मिळवीत बाद फेरीचा प्रवेश निश्चित केला.

वाडिया पार्कने पुन्हा एकदा कबड्डीचा वक्तशीरपणा अनुभवला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेला साजेसे असे नियोजन असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे आजचे सामनेही वेळेवर सुरू झाल्याचे कबड्डीप्रेमींना सूर्यप्रकाशतही कबड्डीचा मनमुराद आनंद लुटता आला. सर्वांचे लक्ष महाराष्ट्राच्या लढतीकडे होते. काल गुजरातचा पराभव केल्यानंतर आजही जोरदार खेळाची अपेक्षा होती आणि महाराष्ट्राच्या सुपरस्टार खेळाडूंनीही त्याची पूर्तता केली. पहिल्या डावात आदित्य शिंदे आणि संकेत सावंतच्या खेळाने दिल्लीवर लोण लादत महाराष्ट्राला दणकेबाज सुरुवात करून दिली. कर्णधार अस्लमला आजही आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही; पण त्याने चांगल्या पकडी करत भरपाई केली. चढाई-पकडीच्या सुसाट खेळामुळे मध्यंतराला 23-12 अशी आघाडी घेत महाराष्ट्राने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती.

मात्र दुसऱ्या सत्रात आकाश शिंदेची पकड करून दिल्लीने सामन्यात चुरस आणली. खेळ सुरू होऊन केवळ तीन मिनिटे झाली होती आणि महाराष्ट्राकडे 27-15 अशी आघाडी होती, पण तेव्हाच सामन्याने कूस बदलली. महाराष्ट्राचे संरक्षण भेदण्यात दिल्लीने यश मिळवले आणि मग अनपेक्षितपणे लोण चढवत दिल्लीने 24-28 असा गुणफलक बदलला. हा क्षण महाराष्ट्राचा ठोका चुकवणारा होता. सामना निसटण्याची वेळ आली होती. दुसरीकडे दिल्ली महाराष्ट्रावर दुसरा लोण चढवण्याच्या प्रयत्नात होती. सामना संपायला केवळ 7 मिनिटे शिल्लक होती. दिल्लीने स्कोअर 29-32 केला होता. दिल्लीच्या चढाईपटूला महाराष्ट्राला ऑलआऊट करण्याची संधी होती, पण मैदानात असलेल्या अस्लम, आदित्य आणि आकाश या त्रिपुटाने सुपर टॅकल करत महाराष्ट्राला पुन्हा आघाडीवरच नव्हे, तर विजयासमीपही नेले. शेवटचे मिनिट असताना मैदानात उतरलेल्या सौरभ राऊतने सुपर चढाई करताना दिल्लीच्या तिन्ही खेळाडूंना बाद करत तिसरा लोण चढवला आणि महाराष्ट्राच्या 30-43 अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यापूर्वी गोव्याने ‘क’ गटात मणिपूरचा 51-34 असा पराभव करीत साखळीतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. पूर्वार्धात 9 बोनस गुण मिळवत, 1लोण देत व 1 अव्वल पकड करीत 31-21 अशी गोवा संघाने आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी 1 लोण देत व 4 बोनस करीत गुणांचे अर्धशतक पार केले. मणिपूरनेदेखील उत्तरार्धात एक लोण देत, 4 बोनस घेत व 2 अव्वल पकड करीत त्यांना बऱ्यापैकी लढत देण्याचा प्रयत्न केला.

याच गटात बिहारने पश्चिम बंगालचा 40-31 असा पाडाव करीत साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली.  विश्रांतीला 24-12 अशी बिहारकडे आघाडी होती. हरयाणाने ‘ड’ गटात चुरशीच्या लढतीत त्रिपुरावर 43-29 अशी मात करीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. चंदिगडने ‘फ’ गटात दोन विजय मिळविताना प्रथम चुरशीच्या लढतीत तेलंगणाला 35-20 असे पराभूत केले. पहिल्या डावात 35-20 अशी आघाडी घेणाऱ्या चंदिगडला दुसऱ्या डावात मात्र तेलंगणाने विजयाकरिता चांगलेच झुंजविले. दुसऱ्या उशिरा झालेल्या सामन्यात चंदिगडने छत्तीसगडला 39-19 असे सहज नमवत बाद फेरीचा मार्ग मोकळा केला.

अशा होतील उपउपांत्यपूर्व लढती

रेल्वे – पंजाब

हिमाचल – राजस्थान

उत्तर प्रदेश – दिल्ली

चंदीगड – गोवा

महाराष्ट्र – विदर्भ

बिहार- कर्नाटक

सेनादल- मध्य प्रदेश

तामीळनाडू- हरियाणा