Apple Watch मुळं वाचले महिलेचे प्राण, विमानात हजारो फुटांवर बिघडली होती तब्येत

ऍपल उत्पादनांमध्ये अनेक नवनविन वैशिष्ट्ये आहेत. याचा फायदा ऍपलच्या वापरकर्त्यांना नेहमीच होत असतो. ऍपलच्या आयफोन आणि ऍपल वॉचने अनेक वेळा लोकांचे प्राण वाचवले आहेत. याचाच प्रत्यय एका महिलेला विमान प्रवासात आला आहे. ज्यामध्ये एका डॉक्टरने आपत्कालीन परिस्थितीत महिलेवर उपचार करण्यासाठी ॲपल वॉचची मदत घेतली.

सदर घटना 9 जानेवारीला घडली आहे. येथे एक महिला ब्रिटनहून इटलीला विमानाने प्रवास करत होती. विमान हजारो फूट उंचीवर असताना अचानक या महिलेची प्रकृती बिघडली. यावेळी महिलेला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. बराच वेळ प्रकृतीत काहीच बदल होत नसल्यामुळे विमान चालकाने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

विमानातील कर्मचारी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी इतर प्रवाशांकडे मदत मागितली. यावेळी विमानात रियाज नावाचे डॉक्टर उपस्थित होते. ते महिलेच्या मदतीसाठी पुढे आले. डॉ. रियाज यांनी त्या महिलेला तपासले.

महिलेच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी चेक करण्यासाठी त्यांनी ऍपल वॉचचा वापर केला. यात महिलेची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे समजले. तेव्हा लगेचच डॉक्टरांनी फ्लाइट स्टाफला ऑक्सिजन सिलिंडर आणण्यास सांगितले. यानंतर विमान उतरेपर्यंत महिलेची ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवण्यात आली होती. तासाभराने विमान उतरल्यानंतर महिलेला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. यामुळे तिचा जीव वाचला.