मालाडमधील गिरनार गॅलेक्सीत भीषण आग, 11 जण जखमी

मालाड पश्चिम येथील गिरनार गॅलेक्सी या आठ मजली इमारतीत आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 11 रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमधील एक जण 60 टक्के भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मालाड पश्चिम सुंदर लेन येथील अंकल किचननजीक असलेल्या गिरनार गॅलेक्सीजवळ असलेल्या या इमारतीला सकाळी 9 वाजता आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांनी जिन्यामधूनच इमारतीबाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने जखमी झाले. यातच टेरेसला लॉक असल्याने ते सुरक्षितरीत्या वर टेरेसवर पोहचू शकले नाहीत.11 जखमींमधील तीन जण पालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात तर इतर आठ जणांना मालाडच्या थुंगा रुग्णायलात दाखल करण्यात आले. थुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका जखमीला शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. तर सुमारे 60 टक्के भाजलेल्या रुग्णाला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. थुंगा रुग्णालयातील तीन रुग्णांना धुराचा त्रास झाल्याचे समोर आले. तीन जणांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. या आगीवर 9.54 वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

तर नोटीस बजावणार

दरम्यान, ही इमारत 18 वर्षांपूर्वीची असून काही दिवसांपूर्वीच इमारतीत नवीन मीटर बॉक्स बसवला होता. मात्र याच ठिकाणी आगीचा भडका उडाला. त्यामुळे या घटनेची चौकशी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुरू आहे. यात इमारत प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे समोर आल्यास नोटीस बजावणार असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.