‘जय भवानी, जय शिवाजी’ वगळण्याचे फर्मान म्हणजे महाराष्ट्रद्वेष! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

शिवसेनेच्या ‘मशाल’ गीतातून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ हे शब्द वगळण्याचे निवडणूक आयोगाचे फर्मान हा एक प्रकारे महाराष्ट्रद्वेषच असल्याचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे. जनशक्ती आमच्यासोबत असून शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी बजावले.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे हे आज शहरात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या चाटूगिरीवर कडाडून टीका केली. शिवसेनच्या ‘मशाल’ गीतातून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही नावे काढणे हा महाराष्ट्रद्वेषच असल्याचे ते म्हणाले. हे दोन्ही शब्द वगळण्याचे फर्मान आम्ही धुडकावून लावत असून या गाण्यातून ते शब्द कदापि काढले जाणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

आमच्यासोबत लोक आहेत, जनशक्ती आहे. त्यांच्या बळावर आम्ही शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी बजावले. ज्यांना सर्व काही दिले, तेच गद्दारी करून पळाले, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरातला पळवले जात असताना हे सगळे मिठाची गुळणी धरून बसले होते, असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत क्रांतीचौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने जाऊन छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘आदित्य ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी क्रांतीचौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. हातात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं पक्षाचे झेंडे फडकावत आणि हातात पोस्टर आणि बॅनर्स घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. चाळीसगाव येथील बॅण्ड पथक, ढोल, ताशांच्या गजरात ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उघडय़ा वाहनात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते आमदार सचिन आहिर, आमदार उदयसिंग राजपूत हे जनतेला अभिवादन करीत होते. क्रांतीचौकातून निघालेली ही मिरवणूक सिल्लेखाना चौक, पैठणगेट, टिळकपथ मार्ग, गुलमंडी, मच्छली खडक, पानदरीबामार्गे संस्थान गणपतीजवळ विसर्जित करण्यात आली. यावेळी माजी आमदार किशोर पाटील, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय वाघचौरे, जि. प. चे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, हरिश्चंद्र लघाने, डॉ. अण्णा शिंदे, लता पगारे, अॅड. देवयानी डोणगावकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, कला ओझा, महानगरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड कार्यकर्ते, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

गद्दार गाडणार…मशाल पेटणार

या मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या हातातील घोषवाक्य लिहिलेल्या पोस्टर्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. गद्दार गाडणार… मशाल पेटणार, विजय सत्त्याचा… पराभव गद्दाराचा, अब की बार… खैरे सरकार, दारू विकणारा गद्दार? की, अन्नदान करणार खुद्दार, नको खोके, नको टक्के.. खैरे साहेब एकदम ओके, आमच ठरलय… आपल्या अस्तित्वासाठी, हक्काच्या एकनिष्ठ माणसासाठी, चोरांनी नेलाय धनुष्यबाण… मशाल आहे आपली शान, या घोषवाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.