बंगळुरूला आता चमत्कारच वाचवू शकतो! सातपैकी सहा सामन्यांतील पराभवांमुळे बंगळुरूवर साखळीतच बाद होण्याचे संकट

विराट कोहलीचा संघ म्हणून आजही लौकिक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएलमधील आव्हान जवळजवळ संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे. सलग पाच आणि एकूण सहा पराभवांनंतर बंगळुरूचे प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य नसले तरी अवघड मात्र आहे. आता त्यांना केवळ सलग सहा विजयांचा चमत्कारच प्ले ऑफमध्ये पोहोचवू शकतो आणि आयपीएलच्या इतिहासात अशा स्थितीत विजयाचा षटकार ठोकणे सोप्पे राहिलेले नाही.

आयपीएलच्या इतिहासातील एक ग्लॅमरस संघ म्हणून बंगळुरूचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. या संघाचे कर्णधारपद अनेक वर्षे विराट कोहलीकडेच होते. मात्र सलगच्या अपयशानंतर 2021 साली त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. 2013 पासून सलग नऊ वर्षे कोहली कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली बंगळुरू चारवेळा प्ले ऑफमध्ये खेळला असला तरी फक्त एकदाच (2016) त्याने आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून दिली होती. तसे पाहता आतापर्यंत 2009, 2011 आणि 2016 साली अंतिम फेरीत पोहोचला आहे, मात्र ते एकदाही आयपीएलचे विजेते होऊ शकलेले नाहीत.

बंगळुरूसाठी गेला मोसमही फार निराशाजनक ठरला होता. ते साखळीतच बाद झाले होते आणि आताही त्यांच्यावर तीच परिस्थिती ओढावली आहे. आयपीएलच्या इतिहासात सात विजय मिळवणारे संघही प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत, पण बंगळुरू सातपैकी सहा सामने हरला आहे आणि त्यांना पुढील सर्वच्या सर्व सातही लढती जिंकत स्पर्धेतील आव्हान राखावे लागणार आहे. जर सातपैकी एकही सामना ते हरले तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक संघांनी सलग सहा आणि सात विजय नोंदवले आहेत, मात्र असा पराक्रम क्वचितच झाला आहे. त्यातच बंगळुरूची गेल्या सात सामन्यांमधील कामगिरी पाहता त्यांच्यासाठी सलग सहा किंवा सात विजय चमत्कारापेक्षा कमी नाही.

साखळीतच बाद होण्याची बंगळुरूची परंपरा

बंगळुरूचा संघ आयपीएलच्या मूळ संघापैकी एक संघ आहे. म्हणजे हा संघ आतापर्यंत सोळाही स्पर्धा खेळला असून सतरावीही स्पर्धा खेळतोय. तसेच आयपीएलमध्ये एकही स्पर्धा न जिंकणाऱया दिल्ली, पंजाबसह बंगळुरूचे नाव आहे. ते तीनदा अंतिम फेरी खेळलेत आणि तब्बल सातवेळी ते प्ले ऑफमध्ये पोहोचले. म्हणजेच 16 पैकी नऊ वेळा बंगळुरू साखळीतच बाद झाल्यामुळे त्यांची ती परंपरा बनली आहे.