महागाईच्या भडका, पेट्रोल डिझेल नंतर सीएनजीच्या दरात वाढ

गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता सीएनजीचीही किंमत वाढली आहे. सीएनजीच्या दरात 2.59 रुपयांनी वाढ झाली आहे. तर घरगुती वापरातील सीएनजीच्या दरात 2.27 रुपयांनी वाढ झाली आहे.

आज मंगळवारपासून ही दरवाढ लागू झाली आहे. मुंबई महानगर भागात ही दरवाढ झाली असून आता एक किलो सीएनजीसाठी ग्राहकांना 54.27 रुपये मोजावे लागणार आहे. तर सीएनजी पाईप गॅसची किंमत 32.67 आणि 38.28 प्रति युनिट इतकी झाली आहे.

गेल्या आठ महिन्यांत मुंबई ठाणे, कल्याण, वसई-विरार आणि नवी मुंबईत सीएनजीच्या दरात झालेली ही तिसरी दरवाढ आहे. महानगर गॅस लिमिटेडने आतापर्यंत सीएनजीच्या दरात 6.67 रुपयांनी वाढ केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी वाढ झाली होती. तर घरगुती वापराच्या सीनजीच्या किंमतीत 95 पैश्यांनी वाढ झाली होती. तर 13 जुलै रोजी सीनजीच्या दरात 2.58 रुपयांनी आणि घरगुती वापराच्या गॅससाठी 55 पैश्यांनी वाढ झाली होती.

केंद्र सरकारने सीएनजीची किंमत 62 टक्क्यांनी वाढवली आहे तर एलएनजीची किंमत वाढल्याने ही दरवाढ केल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडच्या प्रवक्त्या नीरा अस्थाना फाटे यांनी दिली. असे असले तरी पेट्रोल डिझेलच्या किंमतीच्या तुलनेत सीएनजी स्वस्तच आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 108.43 तर डिझेलची किंमत 98.48 इतकी आहे. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी 65 आणि 44 टक्क्यांनी स्वस्त असल्याचेही फाटे यांनी नमूद केले.

सध्या मुंबई महानगर भागात सीएनजीवर चालणार्‍या वाहनांची संख्या 8 लाख इतकी आहे. तर सीएनजीचे 272 पंप असून भविष्यात 372 पर्यंत वाढवण्याचा मुंबई महानगर लिमिटेड कंपनीचा मानस आहे.

आगामी वर्षात वाहन कंपन्यांनी सीएनजीवर चालणार्‍या 3 लाख गाड्यांची निर्मिती केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई महानगर भागात सात लाख घरात सीएनजी जोडणी आहे. एलपीजीच्या तुलनेत सीएनजी 35 टक्क्यांनी बचत करणारे असून सीएनजी ग्राहकांसाठी सुरक्षित आणि उत्तम दर्जाचे असल्याचे मुंबई महानगरने म्हटले आहे.