सुजय विखेंनी मतदारसंघात तोंडही दाखवलं नाही! नगरमध्ये निलेश लंकेंचीच हवा

Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे प्रचाराला उधाण आलं आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील मतदारांच्या मनाचा कौल पाहण्याचं कामही सुरू झालं आहे. दरम्यान, नगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचीच सध्या हवा पाहायला मिळत आहे. कारण, भाजपच्या कारभारावर मतदार नाराज असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

या व्हायरल व्हिडीओंमध्ये स्थानिक माध्यमांनी जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला असून त्यात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याविषयी मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नगर मतदारसंघात विखे पाटील यांच्यावर मतदार नाराज आहेत. गेल्या निवडणुकीला मोठा गाजावाजा करून मतदारसंघात फिरणाऱ्या आणि सेल्फी काढणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये तोंडही दाखवलेलं नसल्याची तक्रार मतदार करत आहेत. शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या धोरणावर शेतकरी नाराज आहे. गॅस अनुदानही बंद झालं असून खतांच्या किमती वाढ झाली आहे. कांद्याला भाव नाही. वीज फक्त रात्रीच्या वेळीच मिळते. सुजय विखे पाच वर्षांत फक्त साखर वाटायला आले होते. कोरोना काळातही सुजय विखेंनी काम केलेलं नाही. भाजप सरकारने आम्हाला काहीही दिलेलं नाही. तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तसंच गावपातळीवरील प्रश्नांची सोडवणूक करणं तर दूरच पण सुजय विखे पाटील हे कुणाचा फोनसुद्धा उचलत नाहीत. त्यांचे स्वीय सहाय्यकही फोन उचलत नसल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. तसंच, कांदा निर्यातबंदी, किमान विक्री दर यांवरूनही मतदारांमध्ये भाजपविरोधात तीव्र नाराजी असल्याचं दिसून येत आहे.

तर दुसरीकडे निलेश लंके यांच्याबाबत मात्र मतदार अतिशय सकारात्मक असल्याचं चित्र आहे. लंके हे सर्वसामान्यांतून वर आलेले आहेत. लंके यांचं समाजकार्य आधीपासूनच खूप चांगलं आहे. त्यांना मतदारसंघातून कुणीही कितीही वाजता मदतीसाठी फोन केला तर ते थेट भेटून त्यांची समस्या सोडवतात. जिथे शक्य आहे, तिथे स्वतःची गाडी घेऊन हजर होतात. कोरोना काळातही त्यांनी खूप मदत केली आहे. त्यामुळे यावेळी नगर मतदारसंघात निलेश लंकेंविषयी अतिशय सकारात्मक मत नगरकरांमध्ये दिसून येत आहे.