विंडीजमध्ये धमाक्यासाठी ‘यशस्वी’, ‘तिलक’ संघात; हिंदुस्थानचा टी-20 संघ जाहीर

वेस्ट इंडीज दौऱयात फलंदाजीचा धमाका करण्यासाठी यशस्वी जैसवाल आणि तिलक वर्मा या दोन युवा खेळाडूंची टी-20 संघात निवड करण्यात आली असून हार्दिक पंडय़ाकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. आज निवड समितीचे नवे अध्यक्ष अजित आगरकर यांनी 15 सदस्यीय संघ जाहीर केला.

रोहित, विराटला विश्रांती

टी-20 वर्ल्ड कपपासून या वेगवान क्रिकेटपासून विश्रांती घेत असलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दिग्गजांना या मालिकेतही विश्रांती देण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदुस्थान आपला अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्या संघातील पृथ्वी शॉ, जितेश शर्मा, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर या सात जणांना संघातून वगळण्यात आले आहे.

हिंदुस्थानचा संघ हार्दिक पंडय़ा (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.