‘हायब्रीड ऍन्युटी’ योजना भाजप कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी, अंबादास दानवे यांची टीका

विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या बैठकीत उल्लेख झालेली हायब्रीड ऍन्युटी ही योजना भाजप कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी वापरली जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. दानवे यांनी ट्विटरवरून मिंधे सरकारवर हल्लाबोल केला.

”50 मिनिटांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मराठवाडा अशा परिस्थितीत असताना महागडे सूट बुक करण्यावर आम्ही बोट ठेवले. म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांना शासकीय विश्रामगृहात राहायला जावे लागत आहे. मराठवाड्याचा अपेक्षाभंग आज मिंधे सरकारने केला आहे. जनता सर्व पाहते, एवढं लक्षात ठेवा”, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला.

या योजना म्हणजे जुनी दारू आणि नवीन बाटली

तसेच ”सरकारने सिंचनाच्या दृष्टीने ज्या घोषणा आज केल्या त्या मधील ‘पार-गोदावरी’ सिंचन योजना मुख्यमंत्र्यांनी सांगून दाखवावी. ज्या घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर झाल्या त्या म्हणजे ‘जुनी दारू आणि नवीन बाटली’ अश्याच आहेत. ज्या ‘हायब्रीड ऍन्युटी’ योजनेचा आज उल्लेख झाला, ही योजना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोसण्यासाठी वापरली जात आहे. पैसे दिले गेले पण या योजनेतील प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही, अशी टीका दानवे यांनी केली आहे.