शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अंबर दलालला उत्तराखंडमध्ये अटक

गुंतवणुक करा आणि चांगला परतावा मिळवा अशी बतावणी करत शेकडो नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अंबर दलाल या सीएला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी उत्तराखंड येथे दलालच्या मुसक्या आवळल्या. त्याने हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याचा संशय असून आतापर्यंत 600 तक्रारदार पुढे आले आहेत. दलालला न्यायालयात हजर केले असता त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ओशिवरा पोलिसांनी अंबर दलाल याच्याविरुद्ध काही गुंतवणूकदारांची कोटय़ावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर दलाल विरोधातील तक्रारदारांची संख्या वाढत गेली आणि फसवणुकीचा आकडा दोनशे कोटीच्या पुढे गेला. त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणात अंबर दलाल याचा शोध घेत होते. अखेर तो उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन त्याला पकडून आणले. या प्रकरणी आतापर्यंत 20 बँक खाती गोठविण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. गुंतवणुक करा आणि मोबदल्यात चांगला परतावा मिळवा अशी बतावणी करत चार्टड अकांऊंटंट असलेल्या अंबर दलाल याने अनेकांना गाजर दाखवले. नागरिकांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवत गुंतवणुक केली. आता पर्यंत फसवणुक झालेल्या 600 गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क केला असून फसवणुकीचा आकडा 380 कोटी इतका असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. दलाल याने फसवणुक केली असे आणखी गुंतवणकदार तक्रार करण्यासाठी पुढे येतील असेही सांगण्यात येते.

हॉटेलात मुक्काम

फसवणुकीचा हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या युनीट-12 कडे तपासाकरिता वर्ग झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रितम बानवले, सहाय्यक फौजदार चंद्रप्रकाश घाग यांनी अंबर दलालचा शोध सुरू केला. दलाल हा मुंबई सोडल्यावर राजस्थानमध्ये गेला. तेथे देवदर्शन केल्यानंतर त्याने उत्तराखंड गाठले. तो तेथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बानवले आणि घाग तिथे गेले. पण दलालने त्याचे मोबाईल बंद ठेवले होते. शिवाय तो एका हॉटेलात केवळ एक ते दोन दिवस राहत होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण बनले होते. मात्र तरी देखील हार न मानता आपल्या काwशल्याच्या जोरावर तपोवनमधील एका हॉटेलातून दलालला उचलण्यात आले.