खारेकर्जुनेत पोलिसांच्या कारवाईत पत्र्याच्या शेडमध्ये आढळला सैन्याचा दारूगोळा

खारे कर्जुने येथील एका व्यक्तीच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सैन्य दलाची स्फोटके व दारूगोळा आढळून आला आहे. दशहतवाद विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस, बीडीडीएस पथक यांनी संयुक्तपणे शुक्रवारी (दि.21) सायंकाळी सव्वासात वाजता ही कारवाई केली. याप्रकरणी दिनकर त्रिंबक शेळके (वय 65, रा. कर्जुने खारे, ता. नगर) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत टँक राऊंड 18, यामध्ये 12 जीवंत व 6 मृत, 5 मोटार राऊंड, 8 ऍम्युनेशन पिस्टल राऊंड, 16 पिस्टल राऊंड, 40 स्विचेस, 25 किलो टीएनटी पावडर, लाल व पिवळी वायर असलेला केबलचा बंडल मिळून आले. या प्रकरणी दशहतवाद विरोधी शाखेचे पोना महादेव गरड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनकर शेळके याच्या घरामध्ये सैन्य दलात वापरल्या जाणार्‍या साहित्याचा साठा असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकातील अधिकारी, अंमलदार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार, बीडीडीएस व एटीएस पथक यांनी संयुक्तपणे शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे एक इसम उभा असलेला मिळून आला. त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव दिनकर त्रिंबक शेळके (वय 65, रा. कर्जुने खारे, ता. नगर) असे सांगितले. त्या ठिकाणी घरासमोरील पत्र्याचे शेडमध्ये आणि भिंती लगत असणारे सामान व लोखंडी पत्रा बाजुला करून झडती घेतली असता, सैन्य दलाची स्फोटके व दारूगोळा आढळून आला. सदरचा दारूगोळा बीडीडीएस पथकाने तपासून ते सुरक्षिततेच्या दृष्टीने जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास करण्यात येत आहे.