रंगभूमी – सीता:शक्ती

>> अभिराम भडकमकर

राम कसा होता? सीता कशी होती? किंवा शेक्सपियरच्या नाटकातली पात्रं मूळ कशी होती? ज्या इतिहासाला हजारो वर्षे झाली आहेत, तो कसा होता यावर चर्चा, वादविवाद हे घडतच राहणार. आपली संस्कृती खंडनमंडनाची परंपरा मानत असल्यामुळे या वादविवादाला एक खुले अवकाश आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या काळानुसार या पात्रांकडे पाहतो. आपापल्या चिंतनातून ही पात्रं रेखाटतो. सीता ही कादंबरी, हा असाच एक प्रयत्न इतिहासामध्ये डोकावण्याचा.

सर्जनशील कलाकारांना आपल्या इतिहासात डोकावून पाहणं नेहमीच आवडतं. विष्णुदास भावेंनी आपलं पहिलं नाटक ‘सीता स्वयंवर’ लिहिलं. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनीसुद्धा आपल्या पहिल्या नाटकाचा विषय ‘महाभारतातली शकुंतला’ हाच घेतला होता. यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं की, कथा लोकांना माहीत असतात. त्यामुळे पात्रांचीही ओळख असते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत आणि त्यामुळे कथा माहीत आहे, पात्रं माहीत आहेत, त्यातील संघर्ष माहीत आहे आणि त्याला एक वेगळे परिमाण देणं हे सर्जकाला नेहमीच आवडतं. म्हणून शेक्सपियरनेसुद्धा त्याच्या नाटकांचे विषय हे त्याच्या इतिहासातल्या कथा, दंतकथा, घटना यांवर बेतले होते. सीता रामायणातलं एक अत्यंत महत्त्वाचं पात्र. किंबहुना, केंद्रस्थानी असलेलं! आपल्याला आपला इतिहास हा मौखिक परंपरेतून कळतो. त्यावरचे ग्रंथ, पुस्तकं. लोकांनी त्यावरून बेतलेल्या कथा, दंतकथा या सगळ्यांतून आपल्याला ही पात्रं भेटत जातात, पण तरीही वेगवेगळ्या काळामध्ये या पात्रांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहण्याची आपल्याला इच्छा होते.

बरं, आपण अशा संस्कृतीत जन्माला आलो आहोत, जिथे आपण आपला देव, धर्म, धर्मग्रंथ यांचं पुनरावलोकन करू शकतो. तो मोकळेपणा, ते स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. त्यामुळे सीता या पात्रावर खूप लिहिलं गेलं. मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे की, रामरक्षेमध्ये ‘सीता:शक्ती’ असा ज्या सीतेचा उल्लेख केला गेला, तिला अबला, अन्यायग्रस्त, बिचारी असं का बरं रंगवलं गेलं असेल? कदाचित ब्रिटिशांच्या नजरेतून सारं काही पाहण्याची एक गुलामी मानसिकता घडल्यामुळे असेल, पण आपण आपल्या इतिहासाकडे मोकळ्या नजरेने भारतीयत्वाच्या नजरेने पाहू शकत नाही का?

काय गंमत आहे नाही? आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रस्ते कसे फुटत जातात. मी काय आपला नाटककार, पटकथाकार, अभिनेता, क्वचित दिग्दर्शक, पण अचानक राजहंसच्या दिलीप माजगावकरांनी माझ्यातल्या कादंबरीकाराची मला जाणीव करून दिली. विनयाताई खडपेकरांनी मला कादंबरी म्हणजे काय हे समजावून दिलं आणि आता पाहता पाहता माझी चौथी कादंबरी येतेय ‘सीता’!

मुळात राम कसा होता? सीता कशी होती? किंवा शेक्सपियरच्या नाटकातली पात्रं मूळ कशी होती? किंवा कुठलाही इतिहासाचा नायक ज्या इतिहासाला हजारो वर्षे झाली आहेत, तो कसा होता यावर चर्चा, वादविवाद हे घडतच राहणार आणि मी म्हटलं त्याप्रमाणे आपली संस्कृती, आपली माती खंडनमंडनाची परंपरा मानत असल्यामुळे या वादविवादाला एक खुले अवकाश आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या काळानुसार या पात्रांकडे पाहतो. गमतीने म्हणायचं झालं तर आपापल्या रंगाने ही पात्रं रंगवतो. आपापल्या चिंतनातून ही पात्रं रेखाटतो. त्यामुळे गंमत बघा ना, शेक्सपियरचा लिअर आपल्या तात्यासाहेबांनी…शिरवाडकरांनी किती छान रंगवला!

असंच ऐतिहासिक पात्रांना आधुनिक संदर्भ देत त्यांची मांडणी करणारे एक श्रेष्ठ नाटककार मराठी रंगभूमीवर होऊन गेले, ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय, ते म्हणजे विद्याधर गोखले!

बहुआयामी व्यक्तिमत्त्व शिवाजी मंदिरपासून ते देशाच्या संसदेपर्यंत सर्वत्र त्यांचा आवाज घुमला. त्यांच्या ‘जय जय गौरीशंकर’ नाटकातले शंकर-पार्वती संवाद पाहून आता कोणी असं म्हणेल की, शंकर कसे होते? देवी पार्वती कशा होत्या? पण अण्णांनी त्यांना समकालीनत्वाचे, आधुनिकतेचे संदर्भ देत मांडलं. शॉच्या ‘पिग्मेलियन’मधली नायिका एलिझा त्यांनी मैनाच्या रूपामध्ये जेव्हा आणली तेव्हा असंच त्याला हिंदुस्थानी रुपडं दिलं.

‘मंदारमाला’मध्ये तर कृष्ण आणि त्याच्या घरातला कलह! कृष्णालासुद्धा त्यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेनं रेखाटलं. कवी, शायर, नाटककार, भाषाप्रभू असे विविध पैलू असलेल्या कै. विद्याधर गोखलेंनी आपल्या इतिहासातली आणि आपल्याच नव्हे, तर परकीय रंगमंचावरच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांचीसुद्धा आपल्या नाटकामध्ये पखरण केली.

हीच गंमत असते. काळ वेगळा, चालीरीती वेगळ्या, माणसे वेगळी, मानसिकता कदाचित वेगळी, पण अखेर वृत्ती आणि प्रवृत्ती या शाश्वत आणि सार्वकालिक असतात ना! या वृत्ती आणि प्रवृत्ती ऐतिहासिक, अगदी दैवत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींनासुद्धा नेसायला लावून ते त्यांचा झक्क छान माणूस करतात आणि आजच्या माणसाला स्वतच्या आयुष्याकडे गंभीरपणे पाहायला लावतात. तेही हसता हसता. ही अण्णांची किमया. आपलं जग आणि जगणं याकडे पाहण्याचं एक भान देणारी अण्णांची नाटकं ही मराठी रंगभूमीवरची एक संपत्तीच मानावी लागेल.

संगीत नाटकाला एक वेगळे रूप देणाऱया, संगीत नाटकातली मरगळ आणि साचलेपण झटकून टाकणाऱया अण्णांची नाटकं आजही सादर केली जातात, पाहिली जातात, त्यांना दाद मिळते. लोकांना त्यामध्ये आपलं आजचं असं काही वाटतं आणि उद्याचंसुद्धा! शाश्वत आणि सार्वकालिक परिसाचा स्पर्श फार मोजक्या लेखकांच्या लेखणीला होतो. अण्णा हे त्यातले एक.

अशा ऐतिहासिक पात्रांबद्दल लिहिताना एक भीती असते. आपण आपलं सगळं त्या पात्रावर लादतोय की काय? आपण त्या पात्राचा देखावा उभा करू. पण मन, मानसिकता, कृती, प्रवृत्ती आपल्याच असतील का? त्याचं रोपण आपण त्या व्यक्तिमत्त्वावर करू का? हे मोठं आव्हान असतं. म्हणजे लेखक स्व-कायाप्रवेश करत लिहितो, पण इथे परकाया प्रवेशाचं आव्हान असतं. ते पेलणं कुठल्याही सर्जकाला आवडतं.

दुसरी महत्त्वाची गोष्ट ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ तर हजारो लेखकांच्या प्रतिभेला भुरळ घालणारी महाकाव्यं! ती आपल्याकडे जन्माला आली हे अभिमानास्पदच! पण गंमत म्हणजे निरक्षरालासुद्धा ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ माहीत असतं. त्याची जडणघडण या महाकाव्यांनी केलेली असते आणि म्हणून एखादी अशिक्षित बाईसुद्धा आपल्या मुलांना “अरे, रामलक्ष्मणाची जोडी बघा. तसं ऱहावा रे तसं ऱहावा” असं म्हणते ते काय असतं? किंवा सहजगत्या एखादी बाई “रावणच आहे मेला” अशी शिवी देऊन टाकते. हे काय असतं? मला असं वाटतं, हे त्या महाकाव्याचं मोठेपण असतं. अनेक शतकांचा काळ ओलांडून ते आपल्या आयुष्याचे संदर्भ बिंदू होऊन बसलेले असतात. ते आपल्या जगण्याला नैतिकतेच्या आणि चांगल्या-वाईटाच्या मोजपट्टय़ा देतात, मापदंड देतात आणि त्यांनी आपण आपलं आयुष्य मोजत असतो, जोखत असतो. अधिक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला कळत असतं की, या प्रयत्नात कदाचित आपण कमी पडू, पण आपण प्रयत्न सोडत नाही. हे त्या महाकाव्याचं मोठेपण असतं आणि म्हणून जगभरातले सगळे लेखक, कवी सर्जक वारंवार आपल्या इतिहासामध्ये डोकावून पाहतात आणि आपण तर सुदैवी! आपल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे.
सीता ही कादंबरी, हा असाच एक इतिहासामध्ये डोकावण्याचा प्रयत्न आणि आपल्या जगण्याच्या मोजपट्टय़ा आणि मापदंड पुन्हा एकदा तपासून पाहण्याचा प्रयत्न आहे.

अण्णांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी त्यांना वंदन करतो आणि आपणा सर्व लेखकांच्या प्रेरणास्थानी असलेल्या ‘रामायण’कार महर्षी वाल्मीकींनाही मी वंदन करतो. त्यापुढे नतमस्तक होतो. हा लेख सीतार्पणमस्तु!

लॉकडाऊनच्या काळामध्ये मी ‘वाल्मीकी रामायण’ वाचायला घेतलं आणि मग मला ‘रामायणा’नं प्रभावितच करून टाकलं. म्हणजे प्रचंड आवडीच्या पातळीवर असलेले ‘रामायण’ आता माझ्या चिंतनाचा विषय झालं. मग ‘अध्यात्म रामायण’, ‘वशिष्ठ रामायण’, ‘तुलसी रामायण’… कितीतरी रामायणं वाचून काढली आणि या पानापानांमध्ये दडलेली सीता मला दिसू लागली. मग लक्षात आलं, ‘सीता:शक्ती’ हे सीतेचे रूप आपल्यापर्यंत आलेच नाही. जनकाने दत्तक घेतलेली भूमीसुता. तिला राजनीतीचं प्रशिक्षण दिलेलं. ती ज्ञानी आहे, ती प्रगल्भ आहे, ज्ञानसंपन्न आहे. आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे निर्णय तिने स्वत घेतले आहेत. वनवास रामाला सांगितला होता, सीतेला नाही, पण तो निर्णय सीतेने स्वत घेतला. ब्रह्मवादिनी गार्गींची ही शिष्या… पुढील आयुष्यामध्ये अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेताना दिसते,सीतेची एक वेगळीच प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली… ती मी मांडतो आहे माझ्या नवीन कादंबरीमध्ये, जिचं नावच आहे ‘सीता’! राजहंस प्रकाशनची ही कादंबरी पुढल्या आठवडय़ामध्ये प्रकाशित होते आहे.

[email protected]
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)