ललित – टिकून राहणाऱ्या गोष्टी

>> अंजुषा पाटील

आपण वेदकालापासून ते आजच्या तंत्रयुगात 21 व्या शतकात नेहमी ऐकत आलो आहोत की, हे जग, हा देह, घर, गाडी, बंगला, पैसा हे सर्व नश्वर आहे. शाश्वत आहे ते फक्त सत्य, प्रेम आणि भक्ती हेच खरे आहे.

शाश्वत म्हणजे अनंत काळपर्यंत टिकणारे. तरीही माणूस नश्वर गोष्टींच्या मागे लागतो. तो माणसाचा स्वभाव आणि गरज आहे. आजकाल तर सर्वजण सुखाच्या, सुखा व गोष्टींच्या मागे लागत आहेत.

आपले माणसांवर असलेले प्रेम, निखळ मैत्री, देवाची भक्ती, श्रद्धा, पारदर्शक व्यवहार, औदार्य, संवेदनशीलता, कृतज्ञता अशा अनेक गुणांनीयुक्त या भावना कायम टिकून राहणाऱया आहेत. पण आजच्या युगात आपली माणसे, मैत्री हे कधी बदलतील ते सांगता येत नाही. परके लोक बिचारे दूरच राहिले.

टिकून राहणाऱया गोष्टी आपल्याच हातात आहेत. यांत्रिक युगात अनेक शोध लागले, जीवन सुखकारक झाले, भौतिक सुविधा वाढल्या, हातात पैसा आला, स्पर्धा वाढल्या, त्याबरोबर षड्रिपूही वाढले. मत्सर, असूया, स्वार्थ माणसाच्या वागण्यातून दिसू लागला. भावनांचा बाजार होऊ लागला. त्यामुळे प्रत्येक गोष्ट पैशाच्या भावाने विकू पाहू लागले.

काही लोक त्यास अपवाद आहेत. चांगली निरामय, पारदर्शक, आदर्श व्यक्ती या जगात, समाजात, आपल्यात आहेत म्हणून अजून तरी चांगले चालले आहे.

‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।
तेणे मुक्ती चारी साधीयेल्या।।
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।।

पण देवाचे नाव घ्यायला वेळ आहे कुणाकडे?’ देव, धर्म, शील, सद्वर्तन याला काही लोक गावंढळपणा म्हणतात, पण या जगात देवच शाश्वत आहे. ज्याने या सृष्टीची निर्मिती केली. जो आपली कर्म साक्षी भावाने वरून किंवा कुठूनही पाहत असतो. ज्याला कोणीही पाहू शकत नाही. त्याचे अस्तित्व फक्त मान्य करावे लागते. 84 लक्ष योनी भोगून हा नर जन्म प्राप्त झालेला असतो आपल्याला, तर त्या कर्म स्वातंत्र्याचा दुरुपयोग करता कामा नये.

काही लोक देव मानत नाहीत. कर्म हाच देव. काही जण कोणती तरी शक्ती म्हणतात. काही निसर्गाला देव मानतात, पण या सृष्टीचा चालक आहे हे मात्र नक्की. जो शाश्वत आहे निरंतर व कायम टिकणारा.
देवावरची श्रद्धा आपला विश्वास, आत्मविश्वास वृद्धिंगत करते. आपल्या कामांना यश देते. जीवनाला एक शिस्त लागते. अनेक गोष्टी नियमानुसार घडतात. त्यासाठी निरर्थक गोष्टींच्या मागे लागून माणसाने वेळ वाया न घालवता शाश्वत टिकणाऱया गोष्टींकडे लक्ष पेंद्रित करून विधायक कर्मे केली पाहिजेत. या समाजात समाज, संस्कृती, भाषा, धर्म, राजकारण, अध्यात्म, समाजसेवा, खासगी संस्था यासाठी झटणाऱया व्यक्ती आणि संस्था आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या जीवनातील काही वेळ किंवा देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त करता येते. समाजाचे आपण ऋणी असतो. त्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही, पण याच गोष्टी शाश्वत व कायम टिकून राहणाऱया आहेत म्हणून त्याची कास धरली पाहिजे.

मोबाईलचा अतिवापर टाळू या. वेळेचा अपव्यय, साधनसामग्रीचे जतन व पाणी, वीज, कागद, नैसर्गिक संपदा यांचे संवर्धन करू या. चिरकाल टिकणाऱया वस्तूंची कास धरू या. सर्वाभूती प्रेम करून एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे वर्तन ठेवण्याची आज गरज आहे. माणसाच्या हातून असे कर्म घडले पाहिजे की, ते कायम टिकून राहणारे व ते नैतिक म्हणजे पवित्रतेचे आणि दुसरे भावनिक म्हणजे प्रेमाचे असेल.