मोनेगिरी- रविकांत नारदमुनी

 

>> संजय मोने

आत्याने नाव मात्र भारदस्त ठेवलं होतं रविकांत आणि तिथेच गोंधळ झाला. कारण वडिलांचं नाव दत्ताराम आणि आडनाव नार्वेकर. म्हणजे आद्याक्षरे होती रदना. त्यात काहीच विचित्र किंवा आक्षेपार्ह नव्हतं, पण आता त्याच्या आद्याक्षरांची तोडमोड होऊन त्याला रदनाऐवजी नारद हे विशेषनाम चिकटलं ते चिकटलंच.

त्याला सगळे नारद म्हणतात, म्हणजे त्याचे नाव नाहीये ते. अजिबात किंवा बिलकुल नाहीये. मग त्याचं मूळ नाव काय आहे आणि तो नारद या नावाने का ओळखला जातो? वाचकांचे पुढचे हे दोन प्रश्न ओघाओघाने विचारले जाणार याची मला पूर्णपणे कल्पना आहे, तर त्याच्sं बारश्याला ठेवलेलं नाव आहे रविकिरण! आपल्याकडे सर्वसाधारणपणे जन्माला आलेल्या अर्भकाचं नाव त्याची आत्या ठेवते. काही काही सुदैवी अर्भकांना आत्याच नसते. मग कोणीतरी थोडेसे अधोगामी दात असलेली स्त्राr नूतन अर्भकाचं नाव कानात कुर्रर्रर्र म्हणून उद्गारते. आमचा एक मित्र आहे त्याचा एक सिद्धांत आहे आणि त्याला स्वतला चार-चार आत्या असूनही तो त्याच्या त्या म्हणण्याला घट्ट चिकटून आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जगातल्या सगळय़ा आत्यांचे दात अगदी थोडेसे का होईना, पण किंचित पुढे असतात, असो! तर आत्याने नाव मात्र भारदस्त ठेवलं होतं रविकांत आणि तिथेच गोंधळ झाला. कारण वडिलांचं नाव दत्ताराम आणि आडनाव नार्वेकर. म्हणजे आद्याक्षरे होती रदना आणि त्यात काहीच विचित्र किंवा आक्षेपार्ह नव्हतं. म्हणजे नातेवाईकांना अथवा शेजाऱया-पाजाऱयांना तसं वाटलं नाही. रदना म्हणजे रविकांत दत्तात्रय नार्वेकर. शाळेतही कुणालाही त्याच्या आद्याक्षरातली गंमत लक्षात आली नाही. त्याला सगळे रवी म्हणत. सुदैवाने मुंबईत जन्म झाल्यामुळे रवी हा रवीच राहिला. कारण पुण्यात जन्म झाला असता तर त्याचा रव्या झाला असता. नाही म्हणायला त्याची आई त्याला कांता म्हणत असे. आता त्याच्या आद्याक्षरांची तोडमोड होऊन त्याला रदनाऐवजी ‘नारद’ हे विशेषनाम चिकटलं ते महाविद्यालयात असताना.

त्रिलोकी नारद असायचा तसा हा सगळीकडे असायचा, नारद त्रिलोकी असायचा की नाही? असावा कारण अमेरिकेत एका राज्यात म्हणजे सिएटल नावाच्या राज्यात मोन्त रेनीअर नावाचा एक पर्वत आहे. तिथे जाताना एक बारीक ओहोळ वाहत असतो त्याला नारद फॉल असं नाव आहे आणि तिथे ते नाव का मिळालं याची विस्तृत माहिती तिथे आहे. हिंदुस्थानी पुराणात नारद नावाचा एक ऋषी होता वगैरे वगैरे, असो! तर रदना नावाचा माणूस नारद का झाला याचे आमच्याकडे काही किस्से आहेत.

आमच्या महाविद्यालयात कुठल्यातरी समारंभाला एक प्रमुख पाहुणे म्हणून एक नेते आले होते. सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते होते ते. बहुधा जागतिक स्त्राr दिन किंवा काहीतरी असावा. त्याच्या दोन महिने आधी त्यांचं नाव एका विनयभंगाच्या खटल्यात गाजत होतं. अर्थात त्यातून ते पुराव्याअभावी सुटले. तेव्हा अशा स्त्राr दिनाला त्यांच्याहून लायक पाहुणा कोण असणार. स्त्राr दिनाचा समारंभ पार पडला, मग सत्कार झाला. त्या त्यांच्या सत्काराला नारदने त्यांना शाल पांघरली, ती देताना तो म्हणाला,

“अरे, या तुमच्याबरोबर? मागच्या एका समारंभात त्या अण्णा साहेबांबरोबर होत्या.’’

त्या बाजूला बसलेल्या बाई चिडून म्हणाल्या,

“काहीतरी बोलू नका. कधी भेटलो होतो आपण?’’

“भेटलो नव्हतो, लासलगावला बाजार समितीची बैठक होती आणि मी तिथे गेलो होतो. तेव्हा अण्णासाहेब त्या समारंभाला आले होते व सरकारी रेस्ट हाऊसमध्ये कांदे पिकवणारे काही शेतकरी त्यांना भेटायला आले होते.ते गेल्यावर त्यांच्या खोलीतून तुम्ही बाहेर आलात. तेव्हा तुमचा हात हातात घेऊन कांद्याच्या भावावरून तुम्हाला ते कानात काहीतरी बरंच काही बोलत होते. तुम्ही कांदा पिकवता का?’’

बाई भरसभेतून उठून गेल्या. मागोमाग प्रमुख पाहुणे त्यांना थांबवायला धावले. ती धावपळ त्यांना झेपणार नव्हतीच. अडखळून ते पडले आणि त्यांचं हाड मोडलं. त्यामुळे इस्पितळात सक्तीची विश्रांती घ्यायला लागली.

त्या सगळय़ा प्रकारानंतर त्याला एकाने छेडलं,

“तू कधी गेला होतास लासलगावला?’’

“जाऊ शकत नाही का? आपला देश आहे.’’

“हो, पण का गेला होतास?’’

“कांदे फार पिकतात तिथे. पूर्वी रेडिओवर त्याचा भाव सांगायचे. नेमकं काय आहे ते बघायला गेलो आणि या बाई तिथे दिसल्या.’’

“हा साला कुठेही फिरत असतो नारदमुनीसारखा.’’ समोरचा म्हणाला आणि त्या दिवसापासून रदनाचा नारद झाला. अगदी नारदमुनी! तो कुठेही असायचा केव्हाही आणि नेमका कोणा कोणाला नको तेव्हा भेटून अडचणीत टाकायचा. पण तो नुसता त्रासदायक नव्हता हे त्याने एकदा सिद्ध करून दिलं. म्हणजे झालं असं की, तो कशासाठी तरी कुठेतरी चालला होता.

“एकदम बडनेरा नावाचं स्टेशन आलं. काय वाटलं कुणास ठाऊक, पण मी गाडी सोडली. एका बाकावर थोडा टेकलो. बाजूलाच एक म्हातारा बाबा बसला होता. हरवलेला वाटत होता. चौकशी केली तर असंबद्ध बोलत होता. खिशात काही कागदपत्रे नाहीत, शिवाय एकही पैसा नाही. मला दया आली त्याची. खूप खोदून खोदून विचारलं तेव्हा तो धुळय़ाचा असावा असं लक्षात आलं. मी तिथून त्याला घेऊन धुळय़ाला पोहोचलो. आपले मित्र असतातच सगळीकडे. एकाच्या घरी त्या बाबाला उतरवला. बाहेर जाऊन नवीन कपडे आणले. त्याला जेवायला घातलं आणि मित्राच्या गाडीतून त्याला घेऊन शोधाशोध करायला लागलो. काही वेळानंतर एका घरासमोर आल्यावर अचानक त्या बाबाच्या डोळय़ांत ओळखीचे भाव आले. उतरून त्या घरात गेलो. घरातून काही लोक धावत बाहेर आले. त्या बाबाचा मुलगा, सून, नातवंडे सगळे रडायला लागले.’’

“अहो, चार दिवसांपूर्वी पहाटे फिरायला म्हणून निघाले ते आलेच नाहीत. अनेक वर्षं रोज फिरायची सवय आहे, पण त्यांना विस्मृती होते अलीकडे.’’

“मग घरातल्या कोणीतरी सोबत जायचं ना?’’ नारदाने जरा चिडून विचारलं.

“सगळय़ांना कामं असतात.’’ सून म्हणाली.

“तुम्ही लहान होतात तेव्हा तुमच्या पालकांनी कामं असतात म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर?’’ नारद आता खरोखरच संतापला होता. घरातले त्यावर काय बोलणार?

“आईबाप एकदाच मिळतात, सांभाळा त्यांना,’’ असं म्हणून नारद निघाला.

“… आणि हो, कांदाभजी खायची इच्छा झाल्ये त्यांना. तुम्हाला तुमच्या कामामुळे त्यांना बनवून खाऊ घालता येणार नाही. तेव्हा घरात कांदा असेल तर द्या. तुमची हरकत नसेल तर मी बनवून देतो. नाहीतर हे घ्या!’’ असं म्हणून त्यांच्यासमोर 50 रुपयांची नोट ठेऊन नारद निघून गेला.

[email protected]