कोल्हापुरात पहिल्या 2 तासात सरासरी साडेसात टक्के मतदान, छत्रपती शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात आज कोल्हापूर जिल्ह्यातील 47- कोल्हापूर आणि 48 -हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात पासून मतदानास सुरुवात झाली .आजपर्यंतच्या निवडणूकांत मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर असलेल्या या जिल्ह्यात यंदा मात्र पहिल्या दोन तासात सरासरी साडे सात टक्के मतदान झाल्याचे दिसून आले.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 11.71 टक्के मतदान झाले.तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 3.50 टक्के मतदान झाले. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 8.50 टक्के मतदान झाले. तर शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 6.21 टक्के मतदान झाले.

कोल्हापुरात पहिल्या 2 तासात सरासरी साडेसात टक्के मतदान, छत्रपती शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क

बहुतांश मतदान केंद्रावर पोलिसांकडून मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्याचा परिणाम मताच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून आले.तर मतदानानिमित्त आज सुट्टी असल्याने, अनेक मतदार आपल्या कुटुंबियांसह मतदानाच्या तयारीत असल्याने, उन्हाची तीव्रता असली तरी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अनेक सुविधांमुळे सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 23 उमेदवार तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तब्बल 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, तब्बल 3 हजार 986 मतदान केंद्रावर आज सकाळी सातपासून मतदानास सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात

विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमाणे

चंदगड-5.60, कागल-8.98, करवीर -11.71, कोल्हापूर उत्तर -9.68, कोल्हापूर दक्षिण-9.06 आणि राधानगरी-3.50 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमाणे हातकणंगले-8.50, इचलकरंजी-7.91,शाहुवाडी-6.21,शिरोळ-8.20 तर सांगली जिल्ह्यातील समावेश असलेल्या ईश्वरपूर-7.76 आणि शिराळा -6.6 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार छत्रपती शाहू शहाजी महाराज यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय याज्ञसेनी महाराणी युवराज व माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशस्वीनीराजे, यशराजे या शाही परिवाराने आपला मतदानाचा हक्क बजावला.